सेतू केंद्राचा हेतूच हरविला
By Admin | Updated: December 25, 2014 23:39 IST2014-12-25T23:39:35+5:302014-12-25T23:39:35+5:30
जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या

सेतू केंद्राचा हेतूच हरविला
वणी : जनतेला तात्काळ सेवा मिळावी़ आवश्यक दाखले व प्रमाणपत्र मिळविताना त्यांची ससेहोलपट होऊ नये म्हणून तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र केंद्र चालकांच्या लापरवाहीमुळे सेतू केंद्राचा मुळ हेतू बाजूला राहिला असून अजुनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी या केंद्रात येरझारा माराव्या लागत आहे़ केंद्रात संगणकांची संख्या वाढली़ मात्र नागरिकांना होणार त्रास कमी झाला नाही़ सेतू केंद्राच्या या लापरवाही कारभारावर नियंत्रण ठेवणारा कोणी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
कधीकाळी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातून मिळणारे प्रमाणपत्र जनतेला मोफत व विनासायास मिळायचे़ मात्र यासाठी शासकीय यंत्रणेच्या अनाठायी वेळ यात खर्च होत असल्याने त्यापासून महसूल मिळविता यावा व जनतेची कामेही तत्काळ व्हावी म्हणून शासकीय सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात आली़ मात्र शासकीय यंत्रणेकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सेतू केंद्र खासगी यंत्रणेकडे देण्यात आली़ येणाऱ्या महसुलामध्ये शासनाचा वाटा निश्चित करण्यात आला़ मात्र विविध कामांसाठी प्रमाणपत्रांची सक्ती सुरू झाल्याने अशी प्रमाणपत्र, शपथपत्र मागणाऱ्यांची संख्या सतत वाढत गेली़ सेतू केंद्राच्या खिडकीवर नागरिकांच्या रांगा दिसायला लागल्या़ प्रस्तावांचे ढिगारे सेतू केंद्रात साचू लागले़ दिलेल्या विहित मुदतीत नागरिकांना प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले होते़ त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे़ मग सेतू केंद्रात दलालीचा शिरकाव झाला़ अर्थपूर्ण व्यवहार करणाऱ्यांना प्रमाणपत्र तत्काळ मिळायला लागली़ त्यामुळे सेतू केंद्रातील काही व्यक्ती दिवसभर सावज टिपण्यातच दिसत होते़ सेतू केंद्राच्या एक खिडकी योजनेला जनता कंटाळली़ त्याचे पडसाद उमटायला लागले़ त्यामुळे शासनाने यामध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी सेतू केंद्राऐवजी महा-ई सेवा सेतू केंद्र सुरू केली़ दोन संगणकाच्या जागी सहा संगणक काम करू लागले़ नागरिकांना ज्या प्रमाणपत्रासाठी १३ ते २० रूपये द्यावे लागत होते़ तेथे आता ३५ रूपये द्यावे लागत आहे़ १५ रूपयाचा अधिक भुर्दंड बसूनही नागरिकांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येरझाराचा घालाव्या लागत आहे़
आता तयार होणारे कोणतेही प्रमाणपत्र दिलेल्या पुराव्यासह तीन डेस्कवर फिरते़ दोन डेस्कवर ओके झाल्यानंतर तिसऱ्या डेस्कवर अधिकाऱ्याची डिजीटल स्वाक्षरी होते़ मधल्या एखाद्या डेस्कवरील कर्मचारी गैरहजर किंवा रजेवर असल्यास त्या दिवसाचे कामकाज पेंडिंग राहते़ त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होतो़ सध्या आॅफ सिजन असताना सेतू केंद्राच हे हाल आहे. तर विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर या केंद्राची काय परिस्थिती राहिल, हे सांगता येत नाही. मग हे महा-ई सेवा सेतू काय कामाचे, असा प्रश्न उपस्थित होतो़ अधिकाऱ्यांनी आताच उपाययोजना केली पाहिजे. (स्थानिक प्रतिनिधी)