चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दर्शविले ‘पक्षिप्रेम’
By Admin | Updated: April 5, 2015 00:06 IST2015-04-05T00:06:52+5:302015-04-05T00:06:52+5:30
पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी येथील गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसराला लागूनच असलेल्या...

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दर्शविले ‘पक्षिप्रेम’
मुकुटबन : पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी येथील गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसराला लागूनच असलेल्या जंगल भागात मातीचे भांडे, टाकावू प्लास्टिकचे ग्लास, डबे, झाडाला बांधून त्यात पाणी भरले आहे.
दिवसेंदिवस वृक्षतोड वाढत आहे. परिणामी जंगले उजाड होत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात सतत बदल होत आहे. या बदलामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. मानव, पशू व पक्षी यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या निष्पाप चिमुकल्या पक्ष्यांना वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक पशुपक्षी पाण्याविना तडफडून मरत आहे. या पक्ष्यांना वाचविण्यासाठी गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरालगतच्या जंगल भागात मातीची भांडी, टाकावू प्लास्टिकचे ग्लास, डबे, झाडाला बांधून त्यात पाणी भरून पशुपक्ष्यांची तहान भागविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
दररोज सकाळी शालेय विश्रांतीनंतर त्यात पाणी भरण्याचा उपक्रम शिक्षकांसह विद्यार्थी राबवित आहे. शिवानंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक शैलेश उंबरकर, अविनाश कोथळे, संगिता वैद्य, विद्यार्थिनी जान्हवी गडेवार, समीक्षा कोपुलवार, कार्तिक बद्दमवार, अनिकेत खडसे, अभिलाष आगुलवार आदी या उपक्रमाला सहकार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. (शहर प्रतिनिधी)