पंच व क्रीडा अधिकाऱ्यांनी रिचविला ४००० कट चहा

By Admin | Updated: September 23, 2016 02:39 IST2016-09-23T02:39:17+5:302016-09-23T02:39:17+5:30

सरकारी पाहुणे अथवा अधिकाऱ्यांची बडदास्त करावी ती क्रीडा विभागासारखी. नाही तर एक प्लेट नाश्ता अन् एक कट चहावर भागविले जाते.

Punch and sports officials created 4000 cut tea tea | पंच व क्रीडा अधिकाऱ्यांनी रिचविला ४००० कट चहा

पंच व क्रीडा अधिकाऱ्यांनी रिचविला ४००० कट चहा

अशीही बडदास्त : १९६० प्लेट नाश्ता खाऊन दिली ढेकर
नीलेश भगत यवतमाळ
सरकारी पाहुणे अथवा अधिकाऱ्यांची बडदास्त करावी ती क्रीडा विभागासारखी. नाही तर एक प्लेट नाश्ता अन् एक कट चहावर भागविले जाते. पाच-पन्नास रुपयात मोकळे ! क्रीडा विभागाने पाहा, केवळ नाश्त्यावर तब्बल ८६ हजार रुपये खर्च केले. खरंच अशी असावी आवभगत. या विभागाने पंच-अधिकाऱ्यांवर केलेली उधळपट्टी तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. ४११३ कट चहा पंच आणि अधिकाऱ्यांनी रिचविल्याचे दाखवून चांगलाच आर्थिक खेळ रंगविला आहे. या विभागाने केलेली चंगळ माहितीच्या अधिकारात पुढे आली आहे.
शालेय स्पर्धा आयोजनासाठी जिल्ह्याला २३ लाख रुपयांचा निधी निर्धारित आहे. त्यापैकी १७ लाख ६६ हजार रुपये निधी प्राप्त झाला. हा निधी हडपण्यासाठी स्पर्धा संयोजकांनी अव्वाच्या सव्वा बोगस बिले जोडली असल्याचे माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. चार हजार एकशे तेरा कट चहा, एक हजार ९६० प्लेट नाश्ता, दोन हजार दोनशे कॅन मिनरल वॉटरचे बिलही काढण्यात आले. २०१५ - १६ या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या कार्यकाळात तालुका व जिल्हास्तर शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा संयोजकांनी जिल्हास्तर स्पर्धेचा सात लाख रुपये निधीच्या खर्चाचा हिशेब सादर केला. त्यात ही बाब उघड झाली आहे.
राज्य शासनाकडून जिल्हास्तरावर चौतीस खेळ स्पर्धांसाठी प्रत्येकी १५ हजार रुपये तर, निवडक सहा खेळांना प्रती खेळ ३० हजार रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा निधी मिळाला. आयोजकांना स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी व पंच-अधिकाऱ्यांसाठी चहा-नाश्ताची व्यवस्था करावी लागते. स्पर्धा संयोजकांनी मात्र जास्तीत जास्त निधी हडपण्यासाठी चहा-नाश्ता व पाण्याची बोगस बिले सादर केली.
जिम्नॅस्टिक या खेळात केवळ चार खेळाडू सहभागी झाले होते. या चार खेळाडूंनी ८० कॅन पिण्याचे पाणी प्यायल्याचे दोन हजार चारशे रुपयांचे बिल जोडण्यात आले. सहा पंच-अधिकाऱ्यांनी १७० कट चहा व ८० प्लेट नाश्ता फस्त केल्याचेही देयक सादर केले आहे. असाच प्रकार स्क्वॅश या कागदोपत्री घेण्यात आलेल्या स्पर्धेतही करण्यात आला आहे.
शालेय व सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, हॉकी व इतर अनेक खेळात खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. तशी तक्रारही तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. असे असताना फुटबॉल स्पर्धेत १८० कॅन तर हॉकीमध्ये ६० कॅन पाण्याचे बिल जोडण्यात आले.
अ‍ॅथलॅटिक्समध्ये जिल्हास्तरावर १५० ते २०० खेळाडू सहभागी झाले होते. मात्र आयोजकांनी २२७४ खेळाडू सहभागी झाल्याचा दावा करीत खेळाडूंवर झालेल्या खर्चाची बिले जोडली आहे. एकूण संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंसाठी तब्बल दोन हजार २०० पिण्याचे कॅन लागले तर, त्यासाठी ६३ हजार रुपयांचे देयक सादर करण्यात आले आहे. (क्रमश:)

Web Title: Punch and sports officials created 4000 cut tea tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.