कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला
By Admin | Updated: July 16, 2016 02:37 IST2016-07-16T02:37:47+5:302016-07-16T02:37:47+5:30
देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते.

कडधान्याचा पेरा दोन लाख हेक्टरने वाढला
कृषी विभाग समाधानी : कपाशी, सोयाबीनमध्ये घट, तूर वाढली
यवतमाळ : देशात कडधान्य लागवडीचे प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे पाहून सरकारने मिशन म्हणून कृषी विभागाला हे प्रमाण वाढविण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने कडधान्याचा पेरा तब्बल दोन लाख हेक्टरने वाढविण्यात यश मिळविले आहे.
कडधान्ये आणि विशेषत: डाळीचा पेरा कमी होत आहे. पर्यायाने डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे सर्वत्र साठेबाजी होत असल्याने भाव गगनाला भिडत आहे. लागवड क्षेत्र वाढविणे, मुबलक प्रमाणात डाळ उपलब्ध करून देणे, आयात रोखणे, साठेबाजी रोखणे या माध्यमातून डाळींचे भाव नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कडधान्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचे मिशन हाती घेतले. त्याची जबाबदारी कृषी खात्यावर सोपविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांना उद्दीष्ट दिले गेले. त्याचा कृषी सहसंचालक, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी सतत आढावा घेत आहे. कृषी विद्यापीठांनाही शेतकऱ्यांना कडधान्य लागवडीसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
जिल्ह्यात खरिपाचे नऊ लाख पाच हजार हेक्टर लागवड क्षेत्र आहे. त्यात दरवर्षी सर्वाधिक कापूस पावणे पाच लाख तर सोयाबीनचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरचे आहे. परंतु यावर्षी त्यात अनुक्रमे ७३ हजार व ३० हजार हेक्टरने घट झाली आहे. त्याऐवजी कडधान्याचे क्षेत्र सध्याच एक लाख ६२ हजार हेक्टरने वाढले आहे. कडधान्याची प्रत्यक्ष लागवड एक लाख ८१ हजार हेक्टरवर झाली आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखी भर पडून हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यात सर्वाधिक ५० हजार हेक्टर क्षेत्र तूर पिकाचे वाढले आहे. (प्रतिनिधी)