सार्वजनिक बांधकामचा कारभार पुन्हा अमरावतीहून
By Admin | Updated: December 16, 2014 23:00 IST2014-12-16T23:00:09+5:302014-12-16T23:00:09+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याची सूत्रे पुन्हा अमरावतीकडे एकवटण्याची चिन्हे आहेत. कारण यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्याचा अतिरिक्त प्रभार आपल्याकडे खेचून आणण्याची विजय बनगीनवार

सार्वजनिक बांधकामचा कारभार पुन्हा अमरावतीहून
अधीक्षक अभियंत्याचा अतिरिक्त प्रभार
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याची सूत्रे पुन्हा अमरावतीकडे एकवटण्याची चिन्हे आहेत. कारण यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्याचा अतिरिक्त प्रभार आपल्याकडे खेचून आणण्याची विजय बनगीनवार यांनी चंद्रपूर मार्गे मुंबईत केलेली खेळी यशस्वी ठरली आहे.
जी.के. लष्करे सेवानिवृत्त झाल्यापासून यवतमाळात सार्वजनिक बांधकाम खात्याला पूर्णवेळ अधीक्षक अभियंता नाही. हा प्रभार सुरुवातीला अमरावतीचे अधीक्षक अभियंता विजय बनगीनवार यांच्याकडे होता. मात्र अमरावतीहून यवतमाळचा कारभार चालविणे सोईचे होत नसल्याचे नमूद करीत बनगीनवार यांच्याकडील प्रभार काढून यवतमाळचे कार्यकारी अभियंता रमेश होतवाणी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. हा कारभार सुरळीत सुरू असताना अचानक पुन्हा अमरावतीतून चक्रे फिरली. यवतमाळ अधीक्षक अभियंत्याचा अतिरिक्त प्रभार पुन्हा विजय बनगीनवार यांच्याकडे सोपविण्यात यावा असे आदेश अमरावतीच्या मुख्य अभियंत्यांकडे धडकले. त्यानुसार मंगळवारी बनगीनवार यवतमाळचा प्रभार घेण्यासाठी येथे उपस्थित झाले.
बनगीनवार हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव श्यामल मुखर्जी यांच्या मर्जीतील मानले जातात. यवतमाळचा पहिला प्रभार देण्यासाठी मुखर्जी यांनीच बनगीनवार यांच्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मुखर्जींचे प्रयत्न जास्त काळ टिकले नाही. आता राज्यात सत्ता बदल होऊन भाजपा-शिवसेना युतीचे सरकार स्थापन होताच बनगीनवार पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी भाजपाचे यवतमाळचे आमदार मदन येरावार यांच्याकडे फिल्डींग लावली. मात्र होतवाणी हेच सोईचे असल्याने येरावारांनी हातवर केले. त्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या बनगीनवार यांनी येरावार यांच्यावर सामाजिक दबाव निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. मात्र येरावार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. म्हणून येरावार यांची तक्रार राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली गेल्याची माहिती आहे. अखेर चंद्रपुरातूनच बनगीनवार यांना ‘ताकद’ देण्यासाठी सूत्रे हलली. तिकडे मुखर्जी यांना केवळ ‘सरकार’मधून निर्देश हवे होते. मुनगंटीवार यांनी इशारा करताच मुखर्जींनी यवतमाळचे प्रभारी अधीक्षक अभियंता म्हणून बनगीनवार यांच्यासाठी आदेश जारी केले.
अमरावतीचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना बनगीनवार यांनी यवतमाळचा अतिरिक्त प्रभार मिळविण्यासाठी जीवाचा एवढा आटापीटा करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. बनगीनवार यांची सेवानिवृत्ती तोंडावर आहे. त्यामुळे तर बनगीनवार यांनी एकाच वेळी अमरावती व यवतमाळ या दोनही जिल्ह्याचा ‘हिशेब’ सांभाळण्यासाठी धडपड चालविली नाही ना असा सूर सार्वजनिक बांधकाम यंत्रणेतून ऐकायला मिळत आहे. बनगीनवार यांनी अतिरिक्त प्रभाराच्या निमित्ताने यापूर्वी कनिष्ठांकडून झालेल्या कुरघोडीचा हिशेब या निमित्ताने चुकता केल्याचे बोलले जाते. सायंकाळी अखेर बनगीनवार यांनी यवतमाळचा प्रभार स्वीकारला. (जिल्हा प्रतिनिधी)