निम्न पैनगंगासाठी जनजागृती
By Admin | Updated: October 8, 2015 02:20 IST2015-10-08T02:20:58+5:302015-10-08T02:20:58+5:30
घाटंजी तालुक्यातील खडका-खंबाळा येथे होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जनचळवळ आणि आंदोलन उभारले जाणार आहे.

निम्न पैनगंगासाठी जनजागृती
शिवाजीराव मोघे : पांढरकवडा येथे सर्व पक्षीयांचा जागृती मेळावा
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील खडका-खंबाळा येथे होऊ घातलेल्या निम्न पैनगंगा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जनचळवळ आणि आंदोलन उभारले जाणार आहे. या प्रकल्पाविषयी जनजागृतीसाठी पांढरकवडा येथे शुक्रवार, ९ आॅक्टोबर रोजी सर्व पक्षीय मेळावा घेण्यात येत आहे. ‘अभी नही तो कभी नही’ हा नारा घेऊन प्रकल्पाचे काम शासनाने सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्हा आणि तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्याला मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यास दुर्लक्षित क्षेत्राचा भाग विकास मार्गावर येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले आहे. केंद्रीय वनखात्याची अंतिम मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण खात्याकडून पर्यावरण प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. विविध ठिकाणच्या न्यायालयात दाखल प्रकरणे निकाली निघाली आहे. पुनर्वसन आणि पुनर्स्थापन आराखड्यालाही केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात कुठलीही अडचण नाही.
या प्रकल्पातील ८० टक्के पाणी महाराष्ट्राला तर १२ टक्के तेलंगाणाला मिळणार आहे. राष्ट्रीय प्रकल्प म्हणूनही हा प्रकल्प होऊ शकतो. यासाठीचे निकष प्रकल्पाने पूर्ण केले आहे. आंतरराज्यीय प्रकल्प आणि दोन लाख हेक्टर सिंचन क्षमता या दोनही अटीमध्ये हा प्रकल्प पूर्ण आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होणे आवश्यक आहे. काम सुरू झाल्यास केवळ १५ दिवसात ९५ टक्के रक्कम केंद्र शासनाकडून उपलब्ध होऊ शकते.
जमिनीचा मोबदला आणि इतर सुविधाही जमीन मालकांना मिळणार आहे. बाजार भावाच्या पाचपटीने रक्कम शेतजमिनीला मिळणार असून शेतातील विहीर, तार कंपाऊंड, फळझाडे आदी बाबींचा मोबदला मिळणार आहे. गावठाणातील रहिवासी प्लॉटच्या बदल्यात तेवढाच प्लॉट नवीन ठिकाणी मिळणार आहे. बांधकाम झालेले घर आणि गोठ्याचे मूल्यांकन करून तेवढी रक्कम दिली जाणार असून प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नोकऱ्यात तीन टक्के आरक्षण आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणे फायदेशीर असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी यावेळी सांगितले. यादृष्टीने जनजागृतीसाठीच ९ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता पांढरकवडा नगरपरिषदेच्या स्टेडियमवर मेळावा घेण्यात येत आहे. माजी मंत्री रामचंद्र रेड्डी हे या मेळाव्याचे अध्यक्ष राहतील. शिवाय सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. याप्रसंगी भारत राठोड, संतोष बोरेले उपस्थित होते. (वार्ताहर)