पं. बुद्धदित्य मुखर्जींनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार
By Admin | Updated: November 25, 2014 23:03 IST2014-11-25T23:03:20+5:302014-11-25T23:03:20+5:30
सतारीच्या तारांवर लिलया फिरणारी बोटे. त्यातून निघणारा सूरमयी स्वर आणि जादुई बोटांनी तबल्यावर धरलेला ताल श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होता. पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी

पं. बुद्धदित्य मुखर्जींनी छेडली श्रोत्यांच्या हृदयाची तार
यवतमाळ : सतारीच्या तारांवर लिलया फिरणारी बोटे. त्यातून निघणारा सूरमयी स्वर आणि जादुई बोटांनी तबल्यावर धरलेला ताल श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होता. पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी यांच्या जुगलबंदीने प्रेरणास्थळावर उपस्थित श्रोत्यांच्या जणू हृदयाची तारच छेडली. निमित्त होते. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृती समारोहानिमित्त आयोजित संगीत संध्या कार्यक्रमाचे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खासशैलीच्या सीतार वादनाने श्रोत्यांवर अमिट छाप सोडणारे पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि प्रसिद्ध तबला वादक सौमेन नंदी यांची जुगलबंदी यवतमाळकर श्रोत्यांसाठी पर्वणीच ठरली. प्रेरणा स्थळाच्या पवित्र आणि निसर्गरम्य वातावरणात या मैफिलीला प्रारंभ झाला. पंडित बुद्धदित्य मुखर्जी यांनी सायंकाळी वाजविल्या जाणाऱ्या कुरिया कल्याण रागाने मैफिलीची सुरुवात केली. ख्याल अंगाने बंदीश सादर करीत मशीतखानी विलंबित गत वाजवून सूरमय वातावरणाची निर्मिती केली. पंडित सौमेन नंदी यांनी विलंबित तीन तालाचा ठेका धरला. स्वर समूहाच्या गमक अंगाने पंडित बुद्धदित्य मुखर्जी सीतारच्या तार छेडत होते. विविध अंगाच्या आक्रमक तिहाई घेऊन समेवर येऊन श्रोत्यांना आनंद दिला. तबला वादक नंदी यांनी विविध प्रकारच्या लयेचा आनंद सतार वादनासोबत घेऊन रसिकांची वाहवाह मिळविली.
ताल सप्तकातील मिंडयुक्त स्वर घेऊन अंतऱ्यावरती सुरांची वेगवेगळी कामगत करून आपल्या सतार वादनाचे सौंदर्य पंडितजींनी श्रोत्यांपुढे सादर केले. त्रितालामध्ये रजाखानी गत घेऊन विविध प्रकारच्या चक्रधार लयीचा प्रकार वादन अंगाने पंडितजी घेत होते. मिंडयुक्त खेचकाम व वादन शैलीची आक्रमकता खटक्याच्या ताना घेऊन पंडितजी सतारवर लिलया बोटे फिरवित होते. त्याच वेळी तबला वादनाचा लयदार ठेका श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत होता. अनिहृत गतीच्या वादनाने सतार व तबला वादकाने एक परमोच्चबिंदू गाठला त्यावेळी श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर पंडित बुद्धदित्य मुखर्जी यांनी अत्यंत गोड असलेला राग झिंझोटी सादर केला. पंडित रविशंकर याच रागात वादन करीत होते. अनेक थोर वादकांनी हा राग सादर केला आहे. तोच राग पंडित मुखर्जी यांनी सादर करून श्रोत्यांना एका वेगळ्या भावविश्वात नेले. मद्रसप्तकापासून अतितार सप्तकापर्यंत वादन कौशल्याने श्रोते भारावून गेले होते. झाला आणि जोड घेऊन आलापाची काम गत करण्यात आली. त्यानंतर आनंदी कल्याण रागातील बंदीश श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव सादर केली. नंदरागाच्या अंगाने सतारवर हा राग सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी सादर केली. एका अविस्मरणीय मैफिलीचा आनंद यवतमाळकर श्रोत्यांनी घेतला.
सुरुवातीला पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी यांनी प्रेरणास्थळावर बाबूजींना आदरांजली अर्पण केली. या तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. पंडीत बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडीत सौमेन नंदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चिफ माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, मातोश्री उषादेवी दर्डा आणि दर्डा परिवारातील सदस्य उपस्थित होते. पंडित बुद्धदित्य मुखर्जी आणि पंडित सौमेन नंदी यांचा परिचय लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर
दर्डा यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पंडीत मुखर्जी आणि पंडीत नंदी यांचा सत्कार करण्यात आला.
(नगर प्रतिनिधी)