‘सायको’ तरुणांंमुळे महिला त्रस्त
By Admin | Updated: November 7, 2015 03:11 IST2015-11-07T03:11:23+5:302015-11-07T03:11:23+5:30
काटोल रोडवरील एका उच्चभ्रू कॉलनीतील महिला मागील पाच महिन्यांपासून काही ‘सायको’ हल्लेखोर तरुणांच्या दहशतीत जगत आहेत.

‘सायको’ तरुणांंमुळे महिला त्रस्त
पाच महिन्यांपासून दहशत : काटोल रोडवरील प्रकार
जगदीश जोशी नागपूर
काटोल रोडवरील एका उच्चभ्रू कॉलनीतील महिला मागील पाच महिन्यांपासून काही ‘सायको’ हल्लेखोर तरुणांच्या दहशतीत जगत आहेत. या तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्या महिलांना त्रासून सोडले आहे. पोलिसांकडूनही प्रभावी मदत न मिळाल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे महिलांसह कुटुंबीयही घाबरले आहेत.
काटोल रोडवरील गिट्टीखदान परिसरात केटी नगर आणि जागृती कॉलनी आहे. एक किलोमीटर पसरलेल्या या परिसरातील महिला या तरुणांच्या त्रासामुळे त्रस्त आहेत. जून महिन्यापासून या घटनांना सुरुवात झाली. जागृती कॉलनीतील महिलेला एक ‘सायको’ तरुण धक्का देऊन फरार झाला. ‘चेन स्नॅचिंग’चा प्रयत्न केला असावा म्हणून महिलेने या घटनेकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर या महिलेला कॉलनीतील दुसऱ्या एका महिलेबाबतही तसाच प्रकार झाल्याचे माहीत झाले. महिन्याभरात अनेक महिला या प्रकारच्या हल्ल्याला बळी पडल्या. एकूणच हा सर्व प्रकार महिला व त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आला. ते अधिक लक्ष ठेवू लागले. त्यामुळे काही दिवस हल्लेखोर तरुणांचे येणे बंद झाले. महिनाभर शांत बसल्यानंतर ते युवक पुन्हा सक्रिय झाले. यावेळी त्यांनी केटी नगरातील महिलांना आपले लक्ष्य बनवायला सुरुवात केली. हे सायको तरुण एक दोन दिवसाआड असे प्रकार करतात. यात ते महिलांना धक्का देणे, त्यांची छेड काढणे, आपत्तीजनक व्यवहार करणे आदी प्रकार करीत असतात. २ नोव्हेंबर रोजी एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला अशाच घटनेला सामोरे जावे लागले.
पोलिसांनी गांभीर्याने घेतले नाही
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हे सायको तरुण पांढऱ्या रंगाच्या दुचाकी वाहनावर असतात. सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान ते परिसरात फिरत असतात. चेन स्नॅचिंग करणाऱ्यांप्रमाणे ते लक्ष ठेवून असतात. एकटी-दुकटी महिला दिसली की ते आपत्तीजनक पद्धतीने धक्का देऊन फरार होतात. पूर्ण घटनक्रम पाच ते सहा सेकंदात घडतो. धक्का दिल्याने महिला घाबरतात. तसेच रात्रीची वेळ असल्याने दुचाकीचा नंबरही पाहता येत नाही. मागील तीन महिन्यात केटी नगरातील अनेक महिलांना या प्रकारच्या घटनांना सामोरे जवे लागले आहे. यासंदर्भात पोलिसांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
या तरुणांची दहशत वाढल्यामुळे आठवड्यापूर्वी केटी नगरातील नागरिक थेट पोलीस ठाण्यात आले. त्यांनी ठाणेदार अवधेश त्रिपाठी यांना केटी नगरात बोलावून चर्चा केली. त्रिपाठी यांनी त्यांना परिसरात गस्त वाढवण्यासंबंधी आश्वासन दिले. तसेच परिसरातील रस्त्यावर दोन बॅरीकेट्स लावले. यादरम्यानच हल्लेखोरांनी पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीवर हल्ला केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा पोलीसांवरून विश्वास उडाला आहे. येथील नागरिक प्रचंड घाबरले आहेत. यासंदर्भात सहआयुक्त राजवर्धन यांनी सांगितले की, या घटनांना गांभीर्याने घेण्यात आले आहे. गिट्टीखदान पोलिसांना हल्लेखोरांना तातडीने शोधण्यात सांगण्यात आले आहे. या परिसराच्या नगरसेविका साधना बरडे यांनी सुद्धा या घटनांबाबत दुजोरा दिला आहे. परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची गरज आहे. महिला दहशतीत आहेत. त्यांना सुरक्षा प्रदान करणे पोलिसांचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महिलांचे एकटे फिरणे बंद
लोकमतशी चर्चा करताना येथील पीडित महिलांनी सांगितले की, अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने महिलांनी घरातून एकटे बाहेर पडणेच बंद केले आहे. सायंकाळच्या वेळी बाहेर जायचेच असेल तर कुटुंबातील सदस्य किंवा शेजारच्यांना सोबत घेऊन जातात. त्यांनी तरुण मुलींनाही सांभाळून राहण्यास सांगितले आहे. काही दिवसांपासून दुपारच्या वेळीसुद्धा अशा घटना घडत आहेत. एका महिलेच्या मोलकरणीवरही अशाच प्रकारचा हल्ला करण्यात आला. येथील महिला प्रचंड संतापलेल्या असून सायको हल्लेखोर हाती लागल्यास अक्कू यादव सारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.