‘एसईए’चे वीज वितरणपुढे धरणे आंदोलन
By Admin | Updated: January 6, 2017 01:56 IST2017-01-06T01:56:04+5:302017-01-06T01:56:04+5:30
महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अधिकारी विकास पानसरे यांनी सोलापूर

‘एसईए’चे वीज वितरणपुढे धरणे आंदोलन
यवतमाळ : महावितरणचे मोहोळ (जि. सोलापूर) येथील उपकार्यकारी अधिकारी विकास पानसरे यांनी सोलापूर येथील कार्यकारी अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. त्यामुळे महावितरण प्रशासनाच्या विरोधात येथील बसस्थानक चौकातील महावितरण कार्यालयासमोर सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनकडून(एसईए) गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
यापूर्वीसुद्धा महावितरणच्या विविध विभागात प्रशासनाच्या जाचाला कंटाळून तीन-चार अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे संघटनेने म्हटले आहे. विकास पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत सोलापूरचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता (ग्रा.) यांना तत्काळ निलंबित करावे, तिनही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरविणे, अभियंत्यांचे कामाचे तास ठरविणे, सभा घेण्याबाबतची नियमावली ठरविणे, अभियंते व कर्मचाऱ्यांना लोकसेवकाचा दर्जा देणे, अतिभारीत उपविभाग व वितरण केंद्राचे विभाजन करणे, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कार्यवाही थांबवून सुदृढ वातावरण निर्मिती करणे आणि बदली धोरणामध्ये सुधारणा व पारदर्शकता आणणे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यवतमाळ येथील आंदोलनात सहसचिव विवेक राऊत, सर्कल सचिव प्रकाश कोळसे, राजेंद्र राऊत, विभागीय सचिव अमित मिश्रा, विकास दरेकर, ज्योती गुर्जर, नरेंद्र चामाटे, पवन सिडामे, आकाश जयसिंगपुरे, अमोल मिरकुटे आदींसह अनेक जण सहभागी झाले होते. तत्पूर्वी झालेल्या द्वारसभेला उज्वल गावंडे, राहुल पावडे, सुहास मेश्राम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)