सज्जनांचे रक्षण करा दुर्जनांना धडा शिकवा
By Admin | Updated: September 4, 2015 02:24 IST2015-09-04T02:24:38+5:302015-09-04T02:24:38+5:30
आगामी सण-उत्सव काळात पोलिसांनी नागरिकांच्या सोबत राहावे, सौजन्याने वागावे, सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांना धडा शिकवावा, ...

सज्जनांचे रक्षण करा दुर्जनांना धडा शिकवा
महानिरीक्षक : जिल्हा पोलिसांना आवाहन
यवतमाळ : आगामी सण-उत्सव काळात पोलिसांनी नागरिकांच्या सोबत राहावे, सौजन्याने वागावे, सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांना धडा शिकवावा, असे भावनिक आवाहन अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
अमरावती येथे रुजू झाल्यानंतर यवतमाळला त्यांची ही पहिलीच भेट होती. आगामी पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षक सिंघल यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सिंघल म्हणाले, ‘सदरक्षणाय-खलनिग्रहणाय’ हे पोलीस खात्याचे ब्रीद आहे. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेसोबत व्यवहार ठेवला पाहिजे. पोलिसांप्रती जनतेत आपुलकी निर्माण करायची असेल तर पोलिसांनी आपली वागणूक सौजन्याची ठेवली पाहिजे. सज्जनांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहून दुर्जनांना त्यांची जागा दाखविण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात पोलीस बंदोबस्त कसा राहील, किती मनुष्यबळाची आवश्यकता भासेल, संवेदनशील ठिकाणे किती, त्यांचा इतिहास याचा आढावा घेताना, वारंवार कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या विघातक घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी करण्याचे आदेशही सिंघल यांनी दिले. अवैध धंद्यांना थारा देऊ नका, अशा व्यावसायिकांपासून चार हात दूर राहा, जनतेत संपर्क वाढवा, असा सल्लाही पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हाभरातील ठाणेदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर अधीक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)