पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात
By Admin | Updated: July 11, 2015 00:13 IST2015-07-11T00:13:55+5:302015-07-11T00:13:55+5:30
भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे.

पुनर्वसनाचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात
‘विजस’ची माहिती : प्रधान सचिवाला राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस
यवतमाळ : भीमकुंडच्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रस्ताव दोन वर्षांपासून मंत्रालयात धूळखात पडून आहे. या संदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाने प्रधानसचिवाला नोटीस बजावल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी यांनी दिली आहे.
दोन वर्षापूर्वी २०१३च्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुरामुळे संपूर्ण भीमकुंडचे शेतकरी व शेतमजूर अभयारण्याच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय जमिनीवर राहण्यासाठी गेल्यावर सरकारने सर्व कुटुंबांना पट्टे , वीज व पाणी देण्याचे आश्वासन २४ महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र सतत पाठपुरावा करूनही सरकारने पुनर्वसन न केल्यामुळे भीमकुंड पुरग्रस्तांनी १२ मार्चला २०१४ रोजी विदर्भ जनांदोलन समितीचे किशोर तिवारी यांच्यामार्फत राज्य मानवाधिकार आयोगाकडे सरकारविरुद्ध दाद मागितली होती व या याचिकेची सुनावणी सोमवारी ७ जुलै रोजी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांचे समोर अमरावती येथे घेण्यात आली. यवतमाळचे जिल्हाधिकारी एस पी सिंग यांनी सरकारतर्फे शपथपत्र सादर करून जिल्हास्तरांवरील समस्या पाणी व वीज पुरवठा देण्याचे काम अंतिम टप्प्यात असून मागील दोन वर्षांपासून पूरग्रस्तांना महसूल जमिनीचे पट्टे देऊन त्यांचे सर्व सुविधांसह पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पुनर्वसन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे धूळखात पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांनी याची गंभीर दखल घेत प्रधान सचिव (पुनर्वसन) यांना नोटीस बजावून जातीने हजर राहून तत्काळ शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले व पुढची सुनावणी मुंबई येथे ठेवण्यात आली आहे .
यावेळी जिल्हाधिकारी एस पी सिंग यांच्या चमूने विषेश प्रयन्त करून पिण्याच्या पाण्याची व वीज पुरवठा देण्यासाठी वेगळा ट्रान्सफार्मर लावल्याबद्दल राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती बुन्नरमठ यांना माहिती दिली. राज्य मानवाधिकार आयोगाच्या समोर भीमकुंडवासी किरण कोलवते, गजानन मामीडवार, नारायण रेड्डीवार, विठ्ठल गावंडे, गणपतराव कन्नलवार, बालू प्रतापवार, बाळासाहेब कन्नलवार, रमेश पाटील, अतुल नगराळे, नाना नगराळे, नाना अगरुलवार, कृष्णा मारपवार, किष्टन्ना मॅकलवार, अशोक मॅकलवार, दत्ता गेडाम, कमलाबाई नैताम, किष्टाबाई गोपावार, गंगाबाई शलार्वार, वासुदेव नैताम, समितीचे सचिव मोहन जाधव, अंकीत नैताम, सुरेश बोलेनवार, नितीन कांबळे, नंदू जयस्वाल, संतोष नैताम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)