मालमत्तेच्या गुन्ह्यांना ब्रेक, शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले

By Admin | Updated: October 28, 2015 02:47 IST2015-10-28T02:47:07+5:302015-10-28T02:47:07+5:30

यवतमाळ शहरातील ‘प्रॉपर्टी आॅफेन्सेस’ला ब्रेक लागला असून अचानक ‘बॉडी आॅफेन्सेस’च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.

Property crime brakes, body crime increased | मालमत्तेच्या गुन्ह्यांना ब्रेक, शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले

मालमत्तेच्या गुन्ह्यांना ब्रेक, शरीरासंबंधीचे गुन्हे वाढले

कायदा व सुव्यवस्था बिघडली : यवतमाळ शहरात खुनांची मालिका
यवतमाळ : यवतमाळ शहरातील ‘प्रॉपर्टी आॅफेन्सेस’ला ब्रेक लागला असून अचानक ‘बॉडी आॅफेन्सेस’च्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने येथील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. एकट्या शहरात गेल्या महिन्याभरात खुनाच्या आठ घटना पाठोपाठ घडल्या आहेत. यातील काही घटनांशी पोलिसांचा थेट संबंध येत नसला तरी गुन्हा घडल्यानंतर त्यातील आरोपी शोधण्यातही त्यांना यश आलेले नाही.
येथील मच्छी पूल परिसरात घडलेल्या तिहेरी खुनाच्या घटनेने पोलिसांची कार्यतत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी तत्काळ यवतमाळ गाठून सुमारे चार तास कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन शरीरासंबंधीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचे आणि घडलेल्या गुन्ह्यांमध्ये डिटेक्शन करण्याचे निर्देश दिले. या तिहेरी हत्याकांडाच्या निमित्ताने यवतमाळ शहरात गेल्या महिनाभरात घडलेल्या खुनाच्या अन्य घटनांची प्रकरणेही वर आली आहेत. त्यावर नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली असून भीतीचे वातावरणही पहायला मिळत आहे. महिनाभरात तब्बल आठ खून झाले. यातील पाच खून एकट्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यातील काही खुनातील आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
यवतमाळ शहरात सण-उत्सवापूर्वी मालमत्तेसंबंधीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत होते. शहरात अनेक भागात घरफोडीच्या घटना घडल्या. त्यात लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. भरदिवसा पादचारी महिलांचे मंगळसूत्र हिसकण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे पोलिसांनी चोरी-घरफोडीमधील अट्टल गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केले होते. या काळात सर्वत्र आणि रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत असल्याने चोरट्यांना आपले काम फत्ते करणे कठीण झाले. या गर्दीमुळेच की काय गेल्या काही दिवसात शहरात चोरी-घरफोडीच्या घटना नियंत्रणात आल्या. त्याला चांगलाच ब्रेक लागला. त्यामुळे पोलीस या तपासातून काहीसे रिलॅक्स होते. त्यांच्यावर बंदोबस्ताचा ताण मात्र कायम होता. चोऱ्या-घरफोड्या थांबल्या असताना अचानक शरीरासंबंधीच्या अर्थात रक्तपाताच्या घटनांची मालिका सुरू झाली. एकापाठोपाठ खुनाच्या आठ घटनांना पोलिसांना सामोरे जावे लागले. खुनाच्या या घटनांनी पोलीसही हादरले आहे. एका खुनाचा छडा लागण्यापूर्वीच दुसरा खून घडत असल्याने पोलिसांची तारेवरची कसरत होत आहे. खुनाच्या या घटनांनी संंबंधित पोलीस ठाण्यातील यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न चिन्ह लावले जात आहे. खुनाचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचण्याची भीती आहे. तिहेरी हत्याकांडाच्या घटनेला वेगळे वळण मिळू नये या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या सूचना महानिरीक्षकांनी केल्या. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Property crime brakes, body crime increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.