वॉर्डावॉर्डात प्रचाराचा धुराळा
By Admin | Updated: November 17, 2016 01:34 IST2016-11-17T01:34:28+5:302016-11-17T01:34:28+5:30
नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार वॉर्डावॉर्डात आपली

वॉर्डावॉर्डात प्रचाराचा धुराळा
उमरखेड नगरपरिषद : सर्वच पक्षाचे कार्यकर्ते लागले कामाला
उमरखेड : नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले असून उमेदवार वॉर्डावॉर्डात आपली प्रचार रॅली काढून धुराळा उडवित आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असून प्रत्येकजण आपल्या विजयाचा दावा करीत आहे.
नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष व २४ नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, एमआयएम, बसपा, प्रहारने संपूर्ण शहरात जोरात प्रचार सुरू केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत उमेदवार व कार्यकर्ते मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारात जात आहे. उमरखेड नगरपालिकेमध्ये यावर्षीची निवडणूक अतिशय चुरशीची होण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. आजपर्यंत उमरखेड नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या सरळ लढतीने झाल्या. परंतु या निवडणुकीत प्रथमच चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदारात संभ्रम निर्माण झालेला आहे. यावेळी सर्वात जास्त काँग्रेसच्या परंपरागत मतांचे विभाजन होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य कमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गत निवडणुकीमध्ये अग्रवाल व माहेश्वरी या दोन गटांनी एकत्र निवडणूक लढविली. त्यामुळे नगरपालिकेत सत्ता बहुमतात येवून अध्यक्ष व उपाध्यक्ष त्यांचाच झाला होता. परंतु या निवडणुकीत तसे चित्र नाही. दोघांमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे राजकीय वाद विकोपाला गेला. त्यामुळे ते एकमेकांच्याविरोधात लढत आहे. या दोघातील वादामुळे निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांची गोची होताना दिसत आहे. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, प्रहार, एमआयएम या पक्षांनी प्रचारयंत्रणा जोरकसपणे राबविली आहे. वॉर्डावॉर्डात प्रचार रॅली काढून मतदारांना आकर्षित केले जात आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचार रॅलीमुळे शहरात चैतन्य निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी निवडणुकीचीच चर्चा होताना दिसत आहे. जीवाचे रान करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न होत आहे. गर्दीसाठी कार्यकर्त्यांना रोजंदारीवर बोलावत आहेत. (शहर प्रतिनिधी)