प्रचारात वीज प्रश्न गूल

By Admin | Updated: October 4, 2014 23:32 IST2014-10-04T23:32:32+5:302014-10-04T23:32:32+5:30

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे.

Promoting power question in question | प्रचारात वीज प्रश्न गूल

प्रचारात वीज प्रश्न गूल

भारनियमनाचा अतिरेक : ग्रामीणला केवळ दोन-तीन तास वीज
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक जण विकासाचे स्वप्न दाखवित असताना शेतकरी आणि सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला वीज प्रश्न मात्र गूल झाल्याचे दिसत आहे. तळपत्या उन्हात गावागावात भारनियमनाचे चटके बसत असताना राजकीय पुढारी मात्र वातानुकूलित वाहनात प्रचारात मग्न आहे. वाळणारी पिके पाहून संतप्त शेतकरी वीज वितरणवर रोष व्यक्त करीत असले तरी त्यांचा आवाज मात्र कुणाच्याही कानावर जात नाही.
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने आता वेग घेतला आहे. गावागावात नेते मंडळी विकासाचे स्वप्न विकत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत सर्वसामान्यांचा मीच वाली असा डांंगोरा पिटत आहे. मात्र ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत विपरित आहे. महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्याने पीक अखेरच्या घटका मोजत आहे. सोयाबीन वाळला असून शेतकरी त्यात जनावरे सोडत आहे. तर कपाशीही त्याच वाटेवर आहे. अशा स्थितीत शेतकरी मात्र आशा धरुन पिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या १५ दिवसात अचानक वाढलेल्या भारनियमनाने ओलित करणेही शक्य नाही. ग्रामीण भागात दोन ते तीन तासच आणि तेही रात्रीच वीज पुरवठा होत आहे. अशा स्थितीत कमी दाबाच्या विजेमुळे मोटारपंप जळत आहे. त्यावर पर्याय म्हणून डिझेल पंप खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्याच्याही किंमती दोन-तीन दिवसातच अचानक वाढल्या आहे. शासकीय योजनातील डिझेल पंपाची मागणी करण्यासाठी शेतकरी कृषी विभागात जातात तेथे त्यांची बोळवण केली जात आहे. डोळ्याने वाळणारे पीक पाहून शेतकरी संतप्त होत आहे. वीज वितरणविरुद्ध प्रचंड उद्रेक निर्माण झाला आहे. गावागावातील वीज वितरण केंद्रावर शेतकरी धडकत आहे. त्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. फुलसावंगी येथील वीज वितरण केंद्राची तर शेतकऱ्यांनी दसऱ्याच्या दिवशी तोडफोड केली. शेतकऱ्यांचा संताप समजून घ्यायला कुणी तयार नाही. उलट त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहे. बाभूळगाव तालुक्यातील गव्हळा येथे केवळ तीन तास होणाऱ्या वीज पुरवठ्याने संतप्त झाले. त्यांनी सावर येथील वीज उपकेंद्रावर धडक दिली. साहित्याची फेकाफेक केली. मात्र त्यांचा प्रश्न समजून न घेता १० ते १५ लोकांवर गुन्हे दाखल केले. असेच प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत कोणताही उमेदवार आणि पुढारी विजेचा प्रश्न घेऊन जाब विचारताना दिसत नाही. केवळ शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Promoting power question in question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.