प्रकल्पग्रस्तांनो, धीर धरा
By Admin | Updated: August 29, 2015 02:34 IST2015-08-29T02:34:12+5:302015-08-29T02:34:12+5:30
विरोधी पक्षात असताना आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडायचो. आता आम्ही स्वत:च सत्तेत आलो आहोत, ...

प्रकल्पग्रस्तांनो, धीर धरा
मुख्यमंत्र्यांचा दिलासा : आत्महत्या न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
रूपेश उत्तरवार डेहणी (यवतमाळ)
विरोधी पक्षात असताना आम्ही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडायचो. आता आम्ही स्वत:च सत्तेत आलो आहोत, त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी धीर धरावा, आशा सोडू नये, त्यांच्या समस्यांवर तत्काळ निर्णय घेतला जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला.
बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरण आणि डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सकाळी १०.३० वाजता त्यांचे येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाले. तेथून ते थेट बेंबळा प्रकल्पावर पोहोचले. या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून पाणीसाठा, सिंचन क्षमता, प्रत्यक्ष सिंचन, कालवा-पाटसऱ्यांची कामे याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांचा ताफा डेहणी उपसा सिंचन प्रकल्पावर पोहोचला. तेथे प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर उपस्थित प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपा-शिवसेना युतीच्या नेत्यांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या चांगल्या ठावूक आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी त्या विधिमंडळ सभागृहासह विविध ठिकाणी मांडल्या आहेत. आता हीच युती स्वत: सत्तेत आली आहे. त्यामुळे या समस्यांचा जास्त अभ्यास करावा लागणार नसल्याने त्या तत्काळ सुटण्यास मदत होईल. पुनर्वसितांवर निश्चितच अन्याय झाला आहे. मूलभूत सुविधेची १८ कामे केवळ कागदावरच झाली आहे. त्यातही बहुतांश कामे निकृष्ट आहेत. पुनर्वसितांना दर्जेदार सुविधा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या कामांमध्ये दर्जा राखला न गेल्यास यापुढे अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल. उर्वरित पुनर्वसनासाठी जमीन खरेदी केली जाणार असून त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला दिला जाईल. शेतकऱ्यांना अन्न, आरोग्य सुरक्षा व शिक्षण सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची संपूर्ण जाण असलेल्या किशोर तिवारी यांच्याकडे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनच्या प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे. यवतमाळ व उस्मानाबाद हे शेतकऱ्यांच्या विकासातील पथदर्शी जिल्हे आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपल्या पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. सरकार तुमचे आहे, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन करताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक शेतकऱ्याला कोणत्या ना कोणत्या शासकीय योजनेतून लाभ मिळेलच असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी ३६ निवेदने सादर केली. त्यावर नेमकी काय कार्यवाही झाली, याची माहिती मोबाईल संदेश अथवा पत्राद्वारे दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी डेहणी येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात मुख्यमंत्र्यांनी सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी व अभियंत्यांकडून बेंबळा व डेहणी प्रकल्पासंबंधी सविस्तर आढावा घेतला. धरणातील पाणी साठ्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा, त्यासाठी कालवा, पाटसऱ्यांची कामे वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश दिले. प्रकल्पग्रस्तांच्या सोई-सुविधा व गावांच्या पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिले. सिंचनातील अडचणींबाबत महिनाभरात कृती आराखडा सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, भाजपाचे आमदार डॉ. अशोक उईके, आमदार मदन येरावार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे महासंचालक किशोर तिवारी, धामणगाव रेल्वेचे आमदार विरेंद्र जगताप, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर आदी उपस्थित होते.