लोकसहभागातून समृद्ध शाळेची गती मंदावली
By Admin | Updated: November 17, 2016 01:33 IST2016-11-17T01:33:18+5:302016-11-17T01:33:18+5:30
विद्यार्थी व शाळांची गुणात्मकवादीसाठी लोकसहभागातून समृद्ध शाळा त्यार करण्याचा शासनाने निश्चय केला आहे.

लोकसहभागातून समृद्ध शाळेची गती मंदावली
डोळेझाक : शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज
धनोडा : विद्यार्थी व शाळांची गुणात्मकवादीसाठी लोकसहभागातून समृद्ध शाळा त्यार करण्याचा शासनाने निश्चय केला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना परिश्रम घ्यावे लागणार आहे. मात्र सध्या यासाठी परिश्रमाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे लोकसहभाग समृद्ध शाळेची गती मंदावली आहे. शिक्षण विभागाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक मुलाने प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तर द्यावे, आम्ही इंग्रजीही बोललो पाहिजे, या गुणवत्तेचे स्वयं मूल्यमापन शाळेने आपल्या पातळीवर करावे. या स्वयंभू मूल्यमापनाचे मोजमाप शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांच्या पालकांनी स्वच्छेने करावे, गुणवत्तेबाबत पालक समाधानी होईपर्यंत काम सुरू ठेवावे, यासाठी शाळांच्या प्रामाणिकरणांचे योजना शासन आणणार आहे. सर्व शाळा समृद्ध होण्याच्या दृष्टीने काम करण्यास शासनाने सूचविले आहे. प्राथमिक शिक्षणात लोकसहभाग वाढविण्यासाठी काही सामाजिक संस्थानी निवेदनाच्या माध्यमातून विविध पर्याय सूचविले आहेत. त्याची दखल घेवून शासनाने अध्यादेश काढला आहे. शाळेचा स्थापना दिन दरवर्षी साजरा करून विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचा सहभाग होणार आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी बुद्धी कौशल्य, वेळेचे ऐच्छिक परंतु नियमित योगदान देणाऱ्या व्यक्तींना शिक्षण मित्र असे संबोधण्यात येणार आहे. गावातील तरुण खेळाडू वैयक्तिक सांघिक खेळात शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विद्यार्थ्यांना खेळ शिकवतील, महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसमध्ये सहभागी तरुण, माजी सैनिक, कब बुलबुल सारख्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यास मदत करतील. विज्ञान, गणित, इंग्रजी विषयासाठी त्या क्षेत्रात शिकणारे तरुण शाळेत मदत करून प्रयोगशाळा विकसित करतील. शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्याकडून निधी उभारतील. गावाला मिळणाऱ्या अनुदान व पुरस्काराच्या रकमेतील २० टक्के शाळेसाठी खर्च करणे ग्रामपंचायत कर्मचारी व संगणकासारखी मदत शाळांनी उपलब्ध करून द्यावी, अशी बाब शासनाने सूचविल्या आहेत. त्यामुळे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. (वार्ताहर)