प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे

By Admin | Updated: March 7, 2016 02:18 IST2016-03-07T02:18:05+5:302016-03-07T02:18:05+5:30

जिल्ह्यात अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. यात चांगले यश मिळविलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत कथन करून त्यांनाही ....

Progressive farmers should encourage others | प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे

प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे

सचिंद्र प्रताप सिंह : आत्मा नियामक मंडळाची बैठक, नवीन प्रयोगातून शेतीमध्ये यश
यवतमाळ : जिल्ह्यात अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. यात चांगले यश मिळविलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत कथन करून त्यांनाही नवीन प्रयोगासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आत्मा नियामक मंडळाची सभा शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अनेक शेतकरी विविध प्रयोगांद्वारे चांगले उत्पन्न मिळवित आहेत. या शेतकऱ्यांचे अन्य शेतकऱ्यांकडून अनुकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आत्माच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटाच्या वतीने चांगले काम होत आहे, भाजीपाला उत्पादक गटातील शेतकऱ्यांना हक्काचे विक्रीकेंद्र उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर अन्य महत्त्वाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागास केल्या.
यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळी उपलब्ध करून देण्याबाबत काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. जे शेतकरी यासाठी अर्ज करतील, अशांना प्राधान्याने सदर चाळी उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासोबतच शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींची दुरूस्ती, आत्माच्या शेतकरी गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची उपलब्धता यासोबतच विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनी आत्मा नियामक मंडळाच्या वतीने होत असलेल्या विविध कामांची माहिती बैठकीत सादर केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Progressive farmers should encourage others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.