गावातील समस्यांची गावातच व्हावी सोडवणूक
By Admin | Updated: September 8, 2015 04:36 IST2015-09-08T04:36:36+5:302015-09-08T04:36:36+5:30
सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची

गावातील समस्यांची गावातच व्हावी सोडवणूक
यवतमाळ : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहे. गावकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. समस्यांची सोडवणूक गावातच होऊ शकते. ग्राम समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची कामे गावातच व्हावी, असा प्रयत्न असून त्यासाठी गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
दिग्रस तालुक्यातील डोळंबा व महागाव येथे शुक्रवारी ग्राम समाधान शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरास जिल्हा परिषद सदस्य दिवाकर राठोड, रुक्मिणी उकंडे, पंचायत समिती सदस्य अमोल मोरे, तहसीलदार नितीन देवरे, डॉ. विष्णू उकंडे, राजकुमार वानखडे, डोळंबा येथील सरपंच श्वेता जाधव, महागाव येथील सरपंच प्रभू जाधव, उपसरपंच भीमराव नाटकर उपस्थित होते.
दोनही शिबिरास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आधारकार्ड नोंदणीसोबतच गावकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. दोनही ठिकाणी २२ विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्या निकाली काढण्याचे काम दिवसभर ग्राम समाधान शिबिरात सुरु होते.
उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी विविध शासकीय योजनांची उदाहरणे दिली. प्रत्येकाने शासकीय योजना समजून
संबंधित कार्यालयांमध्ये अर्ज
दाखल केले पाहिजे, असे आवाहन केले.
शासनाच्या योजना गावात व लाभार्थ्यांच्या घरात याव्या यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्या अनुषंगानेच ग्राम समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्ज भरुन घेतले जात आहे. प्रलंबित फेरफार, भूमिहीन मजुरांना अन्न सुरक्षेचा लाभ, विहीर नसणाऱ्यांना विहिरींचा लाभ देण्यासाठी शिबिरातून प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी विहिरीचा कोटा वाढवून घेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी शेतकऱ्यांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनी तातडीने बांधून घ्यावे. यासाठी शासन अनुदान देत असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
शिबिरात विविध प्रकारचे दाखले, फेरफार, आधारकार्ड, निराधार अनुदान, अन्नसुरक्षा, शिधापत्रिकांसाठी नागरिकांकडून अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी दाखल झालेल्या अनेक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शौचालय अनुदान, विविध प्रकारचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकांचे वाटप काही लाभार्थ्यांना करण्यात आले.
(स्थानिक प्रतिनिधी)