वणीत चिल्लर नोटांच्या तुटवड्याने अडचण
By Admin | Updated: November 10, 2016 01:43 IST2016-11-10T01:43:45+5:302016-11-10T01:43:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याची घोषणा करताच,

वणीत चिल्लर नोटांच्या तुटवड्याने अडचण
वणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्याची घोषणा करताच, त्याचा परिणाम बुधवारी नियमित व्यवहारावर झाला. अनेक व्यापाऱ्यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा स्विकारण्यास नकार दिल्याने नागरिकांची चांगलीच अडचण निर्माण झाली. तसेच खरेदी विक्री प्रभावित झाली. काही दुकानदारांनी चक्क आपल्या दुकानासमोर ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाहीत, असा फलकच दुकानासमोर लावला. शहरातील व्यापारी ग्राहकांना चिल्लरचा आग्रह धरताना दिसून आलेत. एकूणच बुधवारी चिल्लरसाठी सामान्यांची मारामार झाली.
नरेंद्र मोदी यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर पुढील दोन दिवस बँका व एटीएम बंद ठेवण्यात येणार असल्याची बाब स्पष्ट केल्यामुळे मंगळवारी रात्री वणीतील राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा दिसून आल्यात. यातील काहींना एटीएममधून पैसे काढता आलेत, तर काही वेळाने पैसे संपल्याने अनेकांना पैसे न काढताच परत जावे लागले. रात्री उशिरापर्यंत एटीएमसमोर नागरिकांची गर्दी दिसून आली. बुधवार व गुरूवारी एटीएम बंद राहणार असल्याची बाब अनेकांना माहित नसल्याने काही लोक बुधवारीदेखील एटीएमवर जाऊन आलेत. मात्र त्यांना आल्या पावली परत यावे, लागले.
पेट्रोल भरण्यासाठी स्थानिक पेट्रोलपंपावर ५०० किंवा एक हजार रुपयांची नोट रुपये गेलेल्या ग्राहकाला चिल्लर नसल्याचे सांगून ५०० रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठी सांगण्यात येत होते. अथवा चिल्लर घेऊन या, असा सल्ला देण्यात येत होता.
दारात आलेल्या भाजी विक्रेत्यांनीसुद्धा पाचशे रुपयांची नोट स्विकारण्यास नकार दिला. भाजी व्यवसायातील दलालांनीदेखील बुधवारी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा स्विकारण्यास नकार दिल्याचे एका भाजी विक्रेत्यांनी सांगितले.
एकूणच नागरिकांमध्ये या विषयात संभ्रम दिसून आला. शहरातील व्यापारपेठेवर याचा परिणाम दिसून आला. (कार्यालय प्रतिनिधी)