आरक्षण सोडतीने दिग्गजांची अडचण
By Admin | Updated: July 3, 2016 02:25 IST2016-07-03T02:25:55+5:302016-07-03T02:25:55+5:30
येथील नगरपरिषदेची प्रभागनिहाय उमेदवार आरक्षण सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. एकूण ५६ जागांपैकी विविध प्रवर्गातील महिलांसाठी २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहे.

आरक्षण सोडतीने दिग्गजांची अडचण
यवतमाळ : येथील नगरपरिषदेची प्रभागनिहाय उमेदवार आरक्षण सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. एकूण ५६ जागांपैकी विविध प्रवर्गातील महिलांसाठी २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहे. या सोडतीमुळे काही दिग्गजांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांची निवडणूक घेण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागनिहाय विविध प्रवर्गातील उमेदवारांची आरक्षण सोडत काढण्यात आली. शनिवारी येथील नगरपरिषद सभागृहात ही सोडत काढण्यात आली. प्रत्येक प्रभागातून यावेळी दोन सदस्य निवडून द्यावे लागणार आहे. त्यात ‘अ‘ गटातील प्रभाग क्रमांक एक, प्रभाग क्रमांक दोन, प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक १५ अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक १२ अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
‘अ‘ गटातीलच प्रभाग क्रमांक तीन, सहा, नऊ, १६, १७, १९, २३ आणि २४ हे नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक चार, १४, २१ आणि २२ अनुसूचित जातीसाठी, तर प्रभाग क्रमांक २७ आणि २८ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक पाच, १0, ११, १८, २0, २५ आणि २६ हे सात प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ‘ब‘ गटातील प्रभाग क्रमांक एक, दोन, तीन, सहा, सात, आठ, नऊ, १२, १३, १५, १६, १७, १९, २३ आणि २४ हे प्रभाग सर्वसाधारण आहेत. याच गटातील प्रभाग क्रमांक चार, पाच, १0, ११, १४, १८, २0, २१, २२, २५, २६, २७ आणि २८ हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी विकास माने आणि मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी आरक्षण जाहीर केले. तत्पूर्वी नागरिकांनी आधी प्रभागाची प्रारूप माहिती देण्याची मागणी केली. नंतरच उमेदवारांचे आरक्षण जाहीर करण्याचा रेटा लावला होता. या आरक्षण सोडतीमुळे काही दिग्गजांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यांना आपला प्रभाग सोडून इतर प्रभागातून उमेदवारी दाखल करावी लागणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)