खासगी जाहिरातींचा बसवर ‘कब्जा’
By Admin | Updated: June 15, 2015 02:39 IST2015-06-15T02:39:30+5:302015-06-15T02:39:30+5:30
येथील आगारातील जवळपास सर्वच बससवर खासगी जाहिरातींनी आपला कब्जा केला आहे.

खासगी जाहिरातींचा बसवर ‘कब्जा’
सुशील निकोडे वणी
येथील आगारातील जवळपास सर्वच बससवर खासगी जाहिरातींनी आपला कब्जा केला आहे. या जाहिरातींमुळे बसचे विद्रुपीकरण होत आहे. विशेष म्हणजे शासकीय जाहिरातींवरच अनेक खासगी पोस्टर लावले जात आहे.
‘बसचा प्रवास-सुखी प्रवास’ हे ब्रीद वाक्य घेऊन चालणाऱ्या महामंडळाच्या बसवर आता खासगी जाहिरातदारांची नजर गेली आहे. त्यांनी आता थेट बसच्या आतमध्येच अनधिकृतपणे पोस्टर लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. आगारात अशी एकही बस बघायला मिळत नाही, की ज्या बसमध्ये खासगी जाहिरात नाही. बसमधून दररोज हजारो नागरिक वेगवेगळ्या ठिकाणावरून प्रवास करतात. एक बस जवळपास दोन ते तीन जिल्ह्यामध्ये फिरून येते. त्याचाच लाभ घेत खासगी जाहिरातदारांनी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये पोस्टर चिपकविण्याचे काम हाती घेतले आहे.
सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. आता बियाण्यांच्या विविध कंपन्यांची जाहिरात बसमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासकीय विभागांनी बसमध्ये लावलेल्या जनहितकारी जाहिराती प्रवाशांना दिसूनच पडत नाही. काही जाहिराती तर शासकीय जाहिरातींवरच थेट प्रवाशांसमोर चिपकवल्या जातात. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसून येते.
शासनाच्या विविध विभागांमार्फत शिक्षण, आरोग्य, आंतरजातीय विवाह, शिष्यवृत्ती, जनधन योजना, शौचालयाबाबत माहिती, वृक्ष योजना, बसमधील सूचना याबाबत जाहिराती लावलेल्या असतात. मात्र याच शासकीय जाहिरातींवर आता खासगी जाहिरातदारांनी आपले पोस्टर चिकविले आहे. अनेक बसमध्ये आयुर्वेदिक दवाखाना, गुप्तरोगावर इलाज, प्रेमविवाह, वशीकरण, बियाणे, मंदिर बांधकाम, गावातील खेळांचे पोस्टर, खासगी दवाखान्याच्या जाहिराती बिनधास्तपणे लावल्या जात आहे. या जाहिरातींवर संपर्कासाठी ते आपला मोबाईल नंबरही टाकून देतात. मात्र अशा जाहिराती लावण्यासाठी महामंडळ परवानगीच देत नसल्याचे सांगण्यात आले. तथापि जाहिरातदार मात्र बसमध्ये कुणीच नसल्याचा लाभ घेत बस एखाद्या फलाटावर उभी राहिली, की पोस्टर चिपकवून मोकळे होतात.
अनेकदा वाहक व चालकच बसमधील पोस्टर काढून टाकतात. मात्र तरीही पुन्हा नवनवीन जाहिरातदार आपली जाहिरात लावतच असतात. आगारात बस जेव्हा वॉशिंगसाठी नेली जाते, तेव्हा बसवरील जाहिराती काढून टाकण्यात येते. मात्र आतमधील जाहिराती तशाच राहतात. या जाहिरातींमुळे अनेक शासकीय योजनांची प्रवाशांना माहिती मिळत नाही. प्रवासादरम्यान शासकीय जाहिरातींद्वारे जनजागृती व्हावी, या हेतूने बसमध्ये जनहित जाहिराती लावल्या जातात. मात्र या जाहिरातींवर आता खासगी जाहिराती लावल्याने प्रवाशांना अनेक योजनांची माहितीच मिळत नाही. त्यांना केवळ अर्धवटच माहिती मिळते.
त्यामुळे शासकीय जाहिरातींचा उपयोग तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या अनधिकृत जाहिरातदारांवर आता धडक कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात बसमध्ये केवळ खासगी जाहिरातींचाच बोलबाला दिसून येईल.