कैद्यांचे हात राबणार पाणी बचतीसाठी

By Admin | Updated: July 21, 2015 01:43 IST2015-07-21T01:43:42+5:302015-07-21T01:43:42+5:30

कळत न कळत गुन्हा घडलेले हात आता पाण्याच्या बचतीसाठी राबणार आहेत. यवतमाळ जिल्हा कारागृहात या कैद्यांच्या

Prisoners will try to save water | कैद्यांचे हात राबणार पाणी बचतीसाठी

कैद्यांचे हात राबणार पाणी बचतीसाठी

रेन वॉटर हार्वेस्टिंग : बांधकाम खाते पुरविणार तांत्रिक ज्ञान
यवतमाळ : कळत न कळत गुन्हा घडलेले हात आता पाण्याच्या बचतीसाठी राबणार आहेत. यवतमाळ जिल्हा कारागृहात या कैद्यांच्या मदतीने रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग केला जाणार आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांची या प्रयोगाला प्रेरणा मिळाली आहे.
जिल्हा दंडाधिकारी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कारागृहाच्या सुरक्षा समितीची बैठक सोमवारी पार पडली. सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वत: पूर्ण कारागृहात फेरफटका मारला. जेवण, सोई-सुविधा, वागणूक याबाबत कैद्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कारागृहाला पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरणातून व्यवस्था केली आहे. याशिवाय कारागृहात स्वतंत्र विहीर आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली जाते. त्यातच कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे पाण्याचे दुुर्भिक्ष्य जाणवण्याची शक्यता असते. यावर्षी आधीच पाऊस कमी आल्याने हे दुर्भिक्ष्य वाढण्याची चिन्हे पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहासाठी रेन वॉटर हार्वेस्टींगचा प्रयोग राबविण्याच्या सूचना केल्या. कारागृह अधीक्षक भुसारे यांनीही तत्काळ प्रतिसाद देत त्यासाठी तयारी दर्शविली. कारागृहातील कैदी-न्यायाधीन बंद्यांच्या मदतीने हा प्रकल्प उभारला जाणार आहे. कैद्यांचे हात या प्रकल्पासाठी राबतील, त्यापोटी त्यांना शासकीय नियमानुसार मोबदलाही दिला जाईल. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नकाशे व अन्य तांत्रिक ज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बांधकाम खात्याचे ज्ञान व कैद्यांच्या परिश्रमाच्या बळावर लवकरच जिल्हा कारागृहात पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब साठविला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा विकास निधीतून पैशाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारागृहातील व्यवस्था व स्वच्छतेवर यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी कैद्यांची वाढती संख्या व अपुऱ्या मनुष्यबळामुळे कोलमडणारी व्यवस्था याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारागृह अधीक्षक भुसारे यांनी अवगत केले. (जिल्हा प्रतिनिधी)

यवतमाळ जिल्हा कारागृहाची पुरुष बंदी क्षमता २२९ एवढी आहे. मात्र प्रत्यक्षात क्षमतेच्या दुप्पट ४३६ बंदी येथे ठेवले गेले आहेत. महिला कक्षाची क्षमता केवळ पाचची असताना तब्बल १३ महिला तेथे ठेवल्या गेल्या आहेत.

Web Title: Prisoners will try to save water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.