तिघे कारागृहात, बाबर कोठडीत

By Admin | Updated: February 8, 2016 02:42 IST2016-02-08T02:42:19+5:302016-02-08T02:42:19+5:30

तालुक्यातील फुलसावंगी येथील २७ लाखांच्या दरोडा प्रकरणातील तिघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

In prison, in Babar's custody | तिघे कारागृहात, बाबर कोठडीत

तिघे कारागृहात, बाबर कोठडीत

फुलसावंगी दरोडा : बुलेट चोरी प्रकरणात अटक, तपासात विशेष प्रगती नाही
महागाव : तालुक्यातील फुलसावंगी येथील २७ लाखांच्या दरोडा प्रकरणातील तिघांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर या दरोड्याचा मास्टर मार्इंड बाबर याला बुलेट चोरी प्रकरणात अटक करण्यात आली असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बाबरला सध्या पुसद शहर पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.
फुलसावंगी येथील व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी २७ लाखांचा दरोडा पडला होता. पोलिसांनी सर्वप्रथम आयोजोद्दीन ऊर्फ लखू नबाब याला मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे मुंबई येथून अटक केली होती. ही कारवाई दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी, आनंद चंदेवाड यांनी केली. लखूच्या अटकेनंतर त्याने दिलेल्या माहितीवरून अशपाक खान सादत खान पठाण याला अटक करण्यात आली. दोघांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर ४ लाख ६२ हजार रुपये रोख आणि इंडिका कार जप्त करण्यात आली. दरम्यान, या दरोड्याचा मास्टर मार्इंड बाबर याने पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. बाबरला सात दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतरही तपासात त्याच्याकडून काहीच हस्तगत झाले नाही. त्याच्याकडे होते नव्हते पैसे नांदेड, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, मुंबई, दिल्ली, गोवा आणि परत नांदेड प्रवासात खर्च केल्याचे सांगण्यात आले. मुख्य आरोपीच्या अटकेनंतरही खास मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा दोन दिवसाची कोठडी न्यायालयाने वाढवून दिली. दोनही वेळी बाबरने पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी संपताच त्याला बुलेट चोरी प्रकरणात अटक करण्यात आली. सध्या तो ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पुसद शहर पोलीस ठाण्याच्या कोडठीत त्याला ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणातील सर्व बारकावे टिपून ती माहिती आरोपीपर्यंत पोहोचविण्यात भूमिका बजावणारा आरोपी देवानंद बापूराव व्हटगिरे यालाही अटक करण्यात आली. सध्या आयोजोद्दीन ऊर्फ लखू, अशपाक खान सादर खान, देवानंद व्हटगिरे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना यवतमाळच्या कारागृहात रवाना करण्यात आले आहे. यातील एक आरोपी सोहेलोद्दीन नबाब पसार आहे. आरोपीच्या अन्य एका भावाने फिर्यादीला धमकावल्याची तक्रार महागाव पोलिसात संदेश मुत्तेपवार यांनी दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)

तपास एलसीबीकडे देण्याची मागणी
फुलसावंगी दरोडा प्रकरणात महागाव पोलिसांच्या भूमिकेवर फिर्यादी संशय व्यक्त करीत असून हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी होत आहे. अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देऊन ठाणेदारासह जमादाराच्या मोबाईल कॉलडिटेल्स तपासण्याची मागणी करण्यात आली होती. यावरून पोलीस कारवाईवर फिर्यादीचे समाधान झाले नसल्याचे दिसत आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी होत आहे.

Web Title: In prison, in Babar's custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.