प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबितच
By Admin | Updated: April 1, 2016 02:54 IST2016-04-01T02:54:49+5:302016-04-01T02:54:49+5:30
शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबितच
शिक्षक संघ : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
वणी : शिक्षकांच्या प्रलंबित विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली.
१९ जुलै २०१४ ला नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळण्यासाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त घरभाडे काढण्यासंबंधी लेखी स्वरूपात अभिवचन दिले होते. तसेच या संदर्भात मार्गदर्शन मागविण्यात आले व त्यानुसार पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना भत्ता लागू करण्यात आला. मात्र शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्यात आला नाही. यावरून कार्यालयाकडून शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळत आहे. तथापि यातून काही शिक्षक वंचित आहे. जे शिक्षक यामधून सुटले, त्यांना एकस्तर वेतनश्रेणी त्वरित लागू करण्याची मागणी संघाने केली आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे करण्याचे शासनाने स्पष्ट निर्देश आहे. त्याकरिता आॅनलाईन प्रणाली कार्यरत आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही महिन्याचे वेतन ५ तारखेच्या आत झाले नाही. यावरून कार्यालय दिरंगाईचे धोरण अवलंबीत असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून अनेक शिक्षकांचे चट्टोपाध्याय वेतनश्रेणीचे प्रस्ताव देण्यात आले आहे. परंतु त्या प्रस्तावावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. ते प्रस्ताव त्वरित मंजुरीसाठी पाठवावे व चट्टोपाध्याय वेतनश्रेणीची प्रलंबित समस्या निकाली काढावी, स्टेपिंग अप प्रकरणे निकाली काढावी, आयकर व २४ क्यू संबंधीची प्रकरणे, एल.टी.सी.रजा सवलत मंजूर करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. (कार्यालय प्रतिनिधी)