तूरडाळीचे भाव गगनाला

By Admin | Updated: October 14, 2015 02:53 IST2015-10-14T02:53:59+5:302015-10-14T02:53:59+5:30

केंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ ..

The price of pigeonpeace | तूरडाळीचे भाव गगनाला

तूरडाळीचे भाव गगनाला

४५ रुपयांची विक्रमी वाढ : दर कमी करण्याचे केंद्राचे आश्वासन फोल
नीलेश यमसनवार पाटणबोरी
केंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ आता तब्बल ४५ रूपयांनी वाढून १७५ रूपये प्रति किलो झाली आहे. परिणामी गृहिणींचे बजेट बिघडले असून जेवणातून आता वरण गायब होते, की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
गतवर्षी कमी झालेला पाऊस व तूरीच्या अत्यल्प उत्पादनामुळे चालू वर्षातील तूरडाळीचा साठा आता संपत आला आहे. त्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते. घाऊक बाजारात आता प्रति किलो १७५ रूपये किंमत पोहोचल्याने किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव २०० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे गरिबाच्या ताटातील वरण गायब झाले आहे. तूरडाळीपाठोपाठ अन्य डाळीच्या दरातही वाढ झाली आहे.
विदर्भातील अकोला येथील किराणाच्या सर्वात मोठ्या मंडीत घाऊक बाजारात तूरडाळ १७५ रूपये प्रती किलो, चनाडाळ ६३, चिल्टा मूगडाळ १००, मूगमोगर ११५, बरबटी मोगर ८०, चिल्टा उडदडाळ १३५, उडदमोगर १५५, मसूरडाळ ८० रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. तूरडाळीची भाववाढ लक्षणीय असून आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतकी भाववाढ झाली आहे.
साखरेचे भाव घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी २ हजार १५० रूपये प्रति क्विंटल होते. आता ते २ हजार ७५० रूपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या भावात दोन महिन्यात ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. २५ रूपये प्रति किलो मिळणारी साखर आता ३० रूपये किलो विकली जात आहे. तसेच शेंगदाण्याचे भाव घाऊक बाजारात ९० रूपये किलो आहे. किरकोळ बाजारात ते १०० रूपये प्रति किलो आहे. फुटाणा (दालीया) घाऊक बाजारात ८० वर पोहोचला असून किरकोळ बाजारात ९० ते १०० रूपये किलो विकला जात आहे. तांदूळाच्या किंमतीत सुमारे २०० ते ४०० रूपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. नवरात्रात उपवासाकरिता लागणारे शेंंगदाणे, साबुदाणा, भगरच्या किंमतीही वाढल्या आहे.
येत्या काही दिवसांत पोहा, मुरमुराच्या किंमतीसुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत. केंद्र व राज्य शासनाने तूरडाळीच्या किंमती कमी करण्याकरिता उचलेली पावले सपशेल अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत चालला आहे. कापसाला तीन हजार ९५० ते चार हजार रूपये भाव खासगी बाजारपेठेत मिळत असून यावर्षी शेतकरी हवालदील झाला आहे.

Web Title: The price of pigeonpeace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.