दारूबंदीसाठी राज्य मार्ग रोखला
By Admin | Updated: April 30, 2015 00:03 IST2015-04-30T00:03:21+5:302015-04-30T00:03:21+5:30
मोहदा येथील सरकारमान्य देशी दारू दुकान, वाईनबार, बीअर शॉपी, हातभट्टी आणि मोहाफुल विक्री कायमस्वरूपी बंद....

दारूबंदीसाठी राज्य मार्ग रोखला
महिलांचा संताप : पथक नियुक्तीचे आश्वासन
रुंझा/मोहदा : मोहदा येथील सरकारमान्य देशी दारू दुकान, वाईनबार, बीअर शॉपी, हातभट्टी आणि मोहाफुल विक्री कायमस्वरूपी बंद व्हावी या मागणीसाठी बुधवारी महिलांनी राज्य मार्ग रोखला. यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
मोहदा येथील महिला मंडळ, महिला बचत गट आणि गावकऱ्यांनी दारूबंदीचा लढा उभारला आहे. २० एप्रिल रोजी घेण्यात आलेला दारूबंदीचा ठराव सादर करूनही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी बुधवारी दुपारी १ वाजता राज्य मार्गावर ठिय्या दिला. दरम्यान पांढरकवडा येथील नायब तहसीलदार दाखल झाले. मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी आदींशी संपर्क केला. येत्या दोन दिवसात मोहदा येथील दुकानांना सील ठोकले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान पांढरकवड्याच्या प्रभारी ठाणेदार राखी गेडाम यांनी मोहदा परिसरातील गावठी दारू बंद करण्यासाठी एक अधिकारी आणि दहा पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमले जाणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात संगीताताई पवार, उमेश मेश्राम, एकदा दारूबंदी समितीच्या अध्यक्ष वनमाला गेडाम, नीता बारी, कमला वांगे, रेखा सहारे, मंगला ढोंगे, पंचफुला टेकाम, पतीबाई राठोड, इंदूबाई जांभुळकर, शांताबाई जिरे, तुषार गबराणी, रुपेश ढोंगे, प्रशांत राऊत, कुंदन कुडमते, पवन नेहारे, अक्षय मेश्राम, अक्षय पोपुलवार आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)