केळापूर जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी

By Admin | Updated: September 30, 2016 03:03 IST2016-09-30T02:58:15+5:302016-09-30T03:03:49+5:30

केळापूर येथील प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा विविध

Preparations for Navratri festival in Kelapur, Jagdamba | केळापूर जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी

केळापूर जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी

विविध कार्यक्रम : एसटी महामंडळाकडून विशेष बसची व्यवस्था, १ आॅक्टोंबरपासून प्रारंभ
नरेश मानकर पांढरकवडा
केळापूर येथील प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा विविध धार्मिक व प्रबोधनात्मककार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
१ आक्टोंबर रोजी संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांच्या पांढरकवडा येथील निवासस्थानावरुन श्री जगदंबा मातेच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे़ ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत केळापूर येथील जगदंबा मंदीरात पोहचेल़ घटस्थापना झाल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येईल़ २ आक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता मान्यवरांचे उपस्थितीत भजन स्पर्धेला सुरुवात होईल व ३ आक्टोंबर रोजी भजन स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण होईल. ४ आक्टोंबर रोजी हास्य सम्राट वऱ्हाडी कवी डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम ‘मिर्झा एक्सप्रेस’ चे आयोजन करण्यात आले आहे. ५ आक्टोंबर रोजी राष्ट्रीय किर्तनकार आचार्य बाळू महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम, ६ आक्टोंबरला किशोर पेंटर यांचा पंचरंगी कॉमेडी शो व ७ आक्टोंबर रोजी ‘स्वर गुरुकुंजाचे’ हा अमोल बांबल प्रस्तुत राष्ट्रीय भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात गुरुकुंज मोझरी येथील बाल कलावंत सहभागी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरु होईल़
नवरात्रात दररोज सकाळची आरती ५ वाजून ५ मिनीटांनी तर संध्याकाळची आरती ७ वाजून ५ मिनीटांनी होईल. भाविकांसाठी एस.टी.महामंडळाने बसेचची व्यवस्था केली असून सकाळी ४.३० वाजतापासून केळापूरसाठी एस.टी.बस सोडण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारा नवरात्रोत्सव याही वर्षी विविध धार्मिकव प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा होत आहे. त्यासाठी व्यवस्थापन मंडळ तयारीला लागले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान केळापूरची जगदंबा देवी
केळापूरच्या प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्र महोत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ होत आहे. नवरात्रात जगदंबामातेच्या दर्शनासाठी होणारी हजारो भाविकांची गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने संपुर्ण व्यवस्था केली आहे. धार्मिक ,पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या केळापूरला विशेष महत्व आहे़ नवरात्रात नऊही दिवस या ठिकाणी नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो़ जगदंबा मातेच्या दर्शनासाठी केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाडा व तेलंगणा या प्रदेशातील भाविक सुध्दा मोठ्या श्रध्देने केळापूरला जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात़ केळापूर या छोट्याशा खेड्यातील जगदंबा मातेचे हे पौराणिक मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे आराध्य दैवत मानले जाते़ जगदंबा मातेच्या दर्शनाने किंवा नामस्मरणाने अनेक संकटांचा नाश होऊन ईच्छीत कार्य व मनोकामना सिध्दीस जाते, अशी भक्तांची श्रध्दा आहे़

Web Title: Preparations for Navratri festival in Kelapur, Jagdamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.