अकाली पावसाचा तडाखा

By Admin | Updated: February 12, 2015 01:50 IST2015-02-12T01:50:35+5:302015-02-12T01:50:35+5:30

वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली ..

Premature rain | अकाली पावसाचा तडाखा

अकाली पावसाचा तडाखा

वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली पावसामुळे या चारही तालुक्यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वणी तालुक्यात रबी हंगामात ३ हजार ५०० हेक्टरवर हरभरा, २ हजार १५ हेक्टरवर गहू, तर ४८५ हेक्टरवर भाजीपाला, ज्वारी, चारा आदींची पेरणी करण्यात आली आहे. गहू आणि हरभरा पीक सध्या जोमात आहे. काही गहू ओंब्यांवर आला आहे. हरभऱ्यालाही गाठी पकडत आहेत. त्यातच आता अकाली पावसाने हजेरी लावल्याने काही परिसरात गहू व हरभरा आडवा झाला आहे.
मारेगाव तालुक्यात अनेक शेतांमधील गहू आडवा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खरिपात पिकांनी दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व आशा रबीतील पिकांवर अवलंबून होत्या. रबीचे पिकही आता हातातोंडाशी आले आहे. मात्र हातातोंडाशी आलेले ही पीकही निसर्ग हिरावून घेत असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा काळजीत पडले आहेत. झरीजामणी तालुक्यातही अकाली पावसाने झोपडून काढले. अनेक शेतांमधील गहू आणि हरभऱ्याला त्याचा चांगलाच फटका बसला.
या अकाली पावसाने वणी शरातील खड्डे पाण्याने भरून गेले. बुधवारी सकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातही गरावा निर्माण झाला. या पावसामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर आता बुधवारी पहाटेच अकाली पावसाने हजेरी लावली अहे. त्यामुळे रबी पिकांना मोठा फटका बसण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
चार कोटींचा विमा लाभ मिळणार
वणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपात हवामान आधारित पीक विमा काढला होता. खरिपात या पिकांचे उत्पन्न घटले. अल्प पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची आस लागून होती. त्यासाठी कृषी विभागाला आता ४ कोटी १५ लाख रूपये प्राप्त झाले आहे. त्यातून ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कपाशीसाठी ३ कोटी १४ लाख रूपयांचा विमा देण्यात येणार आहे. सोयाबीन पिकासाठी ७४0 शेतकऱ्यांना एक कोटी एक लाखांचा विमा लाभ मिळणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी सांगितले. विमा लाभाची ही रक्कम येत्या आठ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Web Title: Premature rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.