गर्भवती पत्नीचा निर्घृण खून
By Admin | Updated: May 15, 2017 00:50 IST2017-05-15T00:50:53+5:302017-05-15T00:50:53+5:30
चारित्र्यावर संशय घेत गर्भवती पत्नीच्या डोक्यात घणाचा घाव घालून जागीच ठार मारल्याची भीषण घटना

गर्भवती पत्नीचा निर्घृण खून
पोफाळीतील घटना : चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात घातला लोखंडी घण
लोकमत न्यूज नेटवर्क
पोफाळी : चारित्र्यावर संशय घेत गर्भवती पत्नीच्या डोक्यात घणाचा घाव घालून जागीच ठार मारल्याची भीषण घटना उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे शनिवारी रात्री घडली. महिलेच्या माहेरच्या मंडळीने ही घटना माहीत होताच पोफाळीत धाव घेतली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
सुनीता माधव पवार (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. माधव बापूराव पवार (२९) असे आरोपी पतीचे नाव आहे. सुनीता ही चार महिन्याची गर्भवती होती. दगड फोडण्याचे काम करणारा माधव आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. शनिवारीही याच कारणावरून वाद झाला. वादात माधवने पत्नी सुनीताच्या डोक्यात दगड फोडण्यासाठी वापरला जाणारा लोखंडी घण घातला. घाव वर्मी बसल्याने तिचा प्रचंड रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. दरम्यान सुनीताचा खून झाल्याची माहिती तरोडा येथे माहेरी झाली.
माहेरच्या मंडळींनी रात्रीच पोफाळीकडे धाव घेतली. त्यामुळे तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील दंगल विरोधी पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अजयकुमार बनसल यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी सुनीताच्या माहेरच्या मंडळींची समजून घालून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान आरोपी माधव पवार याला पोलिसांनी अटक केली. सुनीताचे वडील बाबूराव धोत्रे रा. तरोडा ता. उमरखेड यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीत माधव सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच खून केल्याचे म्हटले आहे. यावरून पोलिसांनी भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मागे मुलगा आणि मुलगी आहे.