मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आईने सोडला प्राण
By Admin | Updated: March 27, 2015 01:35 IST2015-03-27T01:35:20+5:302015-03-27T01:35:20+5:30
घरी लग्नाची जय्यत तयारी झाली. पाहुणे मंडळी आली. लग्न एक दिवसावर होते. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण. अशातच घात झाला.

मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आईने सोडला प्राण
बाभूळगाव : घरी लग्नाची जय्यत तयारी झाली. पाहुणे मंडळी आली. लग्न एक दिवसावर होते. सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण. अशातच घात झाला. मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एका क्षणात आनंदाचे वातावरण दु:खात बदलले. बाभूळगाव तालुक्यातील कोपरा जानकर येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने प्रत्येकजण हळहळत आहे.
बाभूळगाव तालुक्यातील कोपरा जानकर येथील जाफर अली यांची मुलगी राहिना हिचा विवाह सोहळा २७ मार्च रोजी दिग्रस येथील मोहंमद नोहीद सोबत आयोजित होता. या लग्नसोहळ्यासाठी सर्व मंडळी गेल्या काही दिवसांपासून झटत होती. दोन दिवसांपासून पाहुणे मंडळी घरी यायला सुरुवात झाली. वराकडील मंडळीही कोपरा जानकर येथे हजर झाली. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र काही कळायच्या आत राहिनाची आई हसीना बेगम यांना बुधवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. एकच धावपळ झाली. तातडीने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. लग्नाच्या आनंदावर एका क्षणात दु:खाची छाया पसरली.
गेल्या काही महिन्यांपासून हसीना बेगम आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाची तयारी करीत होत्या. त्यांची धावपळ सुरू होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लग्नाच्या एक दिवस आधी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने समाजमन हळहळले. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. शुक्रवारी २७ मार्च रोजी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. (प्रतिनिधी)