शेवटचे दान करताना बुद्धविहाराच्या द्वारात सोडला प्राण
By Admin | Updated: October 16, 2016 00:50 IST2016-10-16T00:50:30+5:302016-10-16T00:50:30+5:30
कष्टातून मिळविलेली आयुष्यातील पुंजी शेवटच्या क्षणी समाजाला दान करण्याची इच्छा तिने शेजाऱ्यांकडे व्यक्त केली.

शेवटचे दान करताना बुद्धविहाराच्या द्वारात सोडला प्राण
अकोलाबाजारच्या ८० वर्षीय अंबूबाई : आयुष्यभर गोळ्या-बिस्किटे विकून जमविलेली पुंजी दिली विहाराला
हमीदखाँ पठाण अकोलाबाजार
कष्टातून मिळविलेली आयुष्यातील पुंजी शेवटच्या क्षणी समाजाला दान करण्याची इच्छा तिने शेजाऱ्यांकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे ही शेवटची इच्छा पूर्ण करतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. गाठीशी बांधून ठेवलेली पुंजी बुद्ध विहाराला दान करीत असतानाच बुद्धविहाराच्या दारातच अंबूबाई बुद्धवासी झाल्या.
अकोलाबाजार येथील अंबूबाई हरिभाऊ खरतडे यांचे गुरुवारी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ८० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येथील प्राथमिक शाळेच्या गेटसमोर बसून गोळ्या, बिस्किटे विकून उदरनिर्वाह केला. पतीच्या व एकुलत्या एक मुलीच्या निधनानंतर अंबूबार्इंनी सामाजिक कार्यातही नेहमी सहभाग घेतला. तुटपुंजा कमाईतही दानशूर व्यक्ती म्हणून त्या परिचित होत्या. गोळ्या बिस्किटे विकून मिळालेल्या पैशातून समाजकार्याला त्यांनी हातभार लावला. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्यांनी बुद्धविहाराला अंत्यसंस्काराकरिता एक लोखंडी शिडी दान दिली.
वय थकल्यामुळे त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला जावू शकत नव्हत्या. परंतु नागपूर प्रवासाची रक्कम बुद्धविहाराला दान म्हणून त्या देत होत्या.
वृद्धापकाळामुळे त्यांना मृत्यूची चाहूल लागली. मृत्यूपर्वी पदरी शिल्लक असलेली रक्कम बुद्धविहाराला दान देण्याची त्यांची इच्छा होती. शेजारी महिलांनी त्यासाठी त्यांना चंद्रमौळी झोपडीतून आॅटोत बसवून बुद्धविहारात नेले. तिथे अंबूबाईने आपल्या फाटक्या लुगड्याच्या पदरात बांधून ठेवलेल्या चंचीतील १२०० रुपये बुद्धविहाराला दान दिले. दान देत असतानाच विहाराच्या दारातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंबूबाईच्या निधनाने उपस्थितांना आश्रू आवरता आले नाही.
माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह अंत्यसंस्काराला नेताना ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ या मंत्राची वंदना करीत न्यावे व तेथे मृतदेहाला अग्नीच देण्यात यावा, अशी इच्छा अंबूबाईने मृत्यूपर्वी व्यक्त केली होती. त्यानुसारच समाजबांधवांनी शुक्रवारी अंत्यसंस्कार केले.