दोन महिन्यांपासून वीज बंद
By Admin | Updated: November 10, 2014 22:50 IST2014-11-10T22:50:43+5:302014-11-10T22:50:43+5:30
ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी

दोन महिन्यांपासून वीज बंद
शेती पिके धोक्यात : वडकी विद्युत कार्यालयाची अशीही अनास्था
खैरी : ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाकडे केलेली तक्रारही दुर्लक्षित आहे. यावरून सदर कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी किती दक्ष आहे, हे दिसून येते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सिंचन करून पीक घेण्याची आशा आहे. परंतु वीज पुरवठाच नसल्याने त्यांच्या या आशेवर पाणी फेरले जात आहे. एकीकडे भारनियमन आणि अपुऱ्या दाबाचा वीज पुरवठा या समस्येला तोंड देताना नाकीनऊ आले असताना दुसरीकडे विद्युत कंपनीच्या अनास्थेमुळे समस्येमध्ये भर पडली आहे.
२७ आॅगस्टच्या रात्री सुनील खंगार यांच्या खैरी शिवारातील शेतात असलेल्या ट्रान्सफार्मरची तोडफोड करून यातील साहित्य लंपास करण्यात आले. तसेच वसंत महादेव कापसे यांच्या शेतातून गेलेल्या तीन खांबावरील वीज तारा ५ सप्टेंबर रोजी चोरी गेल्या. खांब पाडून तारा चोरी गेल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी या खांबांवरून वीज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ही बाब वसंत कापसे यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. वीज पुरवठा नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु वडकी कार्यालयाने तर दूर राळेगाव येथील अभियंत्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. आता अनेक शेतकऱ्यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)