पालिकेचा जेसीबी आरटीओच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:39 IST2019-06-24T21:39:13+5:302019-06-24T21:39:27+5:30
नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला.

पालिकेचा जेसीबी आरटीओच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला. अत्यावश्यक कागदपत्र नसल्याने आरटीओ अधिकाऱ्याने हा जेसीबी थेट कार्यालयात जमा केला. या कारवाईमुळे नगपरिषद आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. प्रकरण अंगावर येणार म्हणून ऐनवेळी सारवासारव करण्यात आली.
नगरपरिषदेकडे असलेल्या वाहनांना रोड टॅक्स लागत नसला तरी इंश्युरन्स नियमित काढावा लागतो. याचे रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन होत नसल्याचे दिसून येते. आरटीओंनी जेसीबीवर अचानक केलेल्या कारवाईतून हा प्रकार उघड झाला. शेवटी मृत जनावर उचलायचे आहे, संवेदनशील विषय असल्याचे सांगून पालिकेने कशीबशी जेसीबीची सुटका करून घेतली. आरटीओतूनही कडक धोरण अवलंबण्याऐवजी सहानुभूती दाखवत हा जेसीबी सोडण्यात आला. ऐनवेळी विभागप्रमुखाने स्वत: जाऊन कागदपत्राची पूर्तता केली.
नगरपरिषद प्रशासन सुस्तावल्याने सर्व विभागात बोंबाबोंब सुरू आहे. अनागोंदी असल्याने कोणावरही नियंत्रण नाही. काही एक दोन टक्के प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या भरवशावर पालिकेचा डोलारा उभा आहे. पदाधिकाºयांनाही येथील अवस्थेशी काहीच सोयरसुतक नाही. त्यामुळे दिवसेन्दिवस परिस्थिती बिकट होत आहे.