दिग्रस येथील पार्कमध्ये निकृष्ट काम, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:08+5:30
शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

दिग्रस येथील पार्कमध्ये निकृष्ट काम, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : शहरातील गिरीराज पार्कमध्ये नूतनीकरण केले जात आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे गेले आहे. हातांचा साधा स्पर्श केल्यास या प्रवेशद्वारावरील सिमेंटचे आवरण गळून पडत आहे. वेल्डींग केलेले दरवाजे बसविण्यात आलेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पार्कभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. या भिंतींनाही जागोजागी भेगा पडल्या आहे. बगीच्यात एका स्टेजची उभारणी करण्यात आली. तेथे फरशी बसविताना सिमेंटचा वापर न करता केवळ रेती टाकण्यात आली. बगीच्यातील प्रसाधनगृहांचीही स्थिती दयनीय आहे. शेकडो रोपटी मातीच्या ढिगाऱ्यात पडून आहे. पाण्याअभावी अनेक रोपटी वाळली आहे. अद्याप बगीचा पूर्णपणे तयार झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हे काम सुरू आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
या सर्व बाबींची नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. आता बांधकाम विभाग कंत्राटदारावर कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
मुख्य प्रवेशद्वाराला गेले तडे
कंत्राटदार कंपनीने मुख्य प्रवेशद्वाराची उभारणी केली. मात्र परिपूर्ण प्रवेशद्वार तयार होण्यापूर्वीच खांबांना तडे जात आहे. या खांबांवरील सिमेंटचे आवरणही तत्काळ गळून पडत आहे. यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येते. याच प्रकारे संपूर्ण बांधकाम झाल्यास भविष्यात लवकरच हा पार्क नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पुढाकार घेत तक्रार केली आहे.