खडकाळ जमिनीवर फुलली डाळिंबाची बाग
By Admin | Updated: February 27, 2016 02:56 IST2016-02-27T02:56:52+5:302016-02-27T02:56:52+5:30
हलक्या प्रतीच्या खडकाळ जमिनीवर एका शेतकऱ्याने डाळींबाची बाग फुलविली असून पहिल्याच तोडीत दोन टनाचे उत्पादन झाले.

खडकाळ जमिनीवर फुलली डाळिंबाची बाग
प्रकाश सातघरे दिग्रस
हलक्या प्रतीच्या खडकाळ जमिनीवर एका शेतकऱ्याने डाळींबाची बाग फुलविली असून पहिल्याच तोडीत दोन टनाचे उत्पादन झाले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर डेहणी येथील युवा शेतकऱ्याने यवतमाळ जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. गजानन वेळूकर असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.
यवतमाळ या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी हलाखीचे जीवन जगत आहे. परंपरागत पद्धतीने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नैराश्यात जात आहे. अशा या शेतकऱ्यांपुढे गजाननने आदर्श निर्माण केला आहे. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे गजाननची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. परंतु ही शेती मुरमाड आणि खडकाड आहे. त्यामुळे यात काही हाती येत नव्हते. त्यामुळे गजाननने फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी डाळींब पिकाची निवड केली. ७५० झाडांची लागवड करून संगोपनासाठी परिश्रम घेतले. यातून त्याची बाग फुलली.
सिंचन व्यवस्थेसाठी पाणी अपुरे पडत असतानाही त्यांनी मोठ्या परिश्रमाने झाडे जगविली. त्याची बाग डाळींबाने बहरुन गेली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या भुवय्या उंचावल्या. दर्जेदार डाळींबाच्या पहिल्या तोडीतून दोन टन उत्पादन हाती आले. परंपरागत शेती व्यवसायाची होणारी अवस्था पाहून गजाननने केलेला हा प्रयोग यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता गजाननकडून मार्गदर्शन घेण्यासाठी अनेक शेतकरी येत आहे. परंतु अद्यापही शासन दरबारी त्याची दखल घेतली नाही. फलोत्पादन योजनेंतर्गत वारंवार मागणी करूनही अनुदान नाकारल्याची खंत गजानन वेळूकर यांनी व्यक्त केली. शासकीय योजनेतील लाभाच्या योजना शेतकऱ्यांना दिल्यास त्याचा फायदा होईल. एकीकडे बळीराजा चेतना अभियान राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला निराश केले जात आहे. परंतु या परिस्थितीवरही मात करीत गजानन आपल्या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहे.