नगरपंचायतीचे मतदान शांततेत

By Admin | Updated: November 2, 2015 01:56 IST2015-11-02T01:56:39+5:302015-11-02T01:56:39+5:30

मारेगाव आणि झरी येथे रविवारी नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पाडले. पहिल्याच निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.

Polling in the municipal polls is peaceful | नगरपंचायतीचे मतदान शांततेत

नगरपंचायतीचे मतदान शांततेत

अनुचित प्रकार नाही : मारेगावात ७३.८२ तर झरीत झाले ८७.३३ टक्के मतदान
मारेगाव : मारेगाव आणि झरी येथे रविवारी नगरपंचायतीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान पार पाडले. पहिल्याच निवडणुकीमुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
मारेगाव येथे १७ प्रभागांतील १७ जागांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांनी मैदानात उडी घेतली होती. या सर्व उमेदवारांचे नशीब आता मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने त्यांच्यात उत्साह दिसून येत होता. त्यामुळे सकाळी ११ वाजतापर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
दुपारनंतर पुन्हा मतदानाला वेग आला. मारेगावात दुपारी ३.३0 वाजतापर्यंत तब्बल ६१.३५ टक्के मतदान झाले. त्यात १ हजार ८४0 पुरूष तर १ हजार ८८८ महिला, अशा एकूण ३ हजार ७२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सर्वच केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून येत होती. पहिल्या निवडणुकीची नवलाई सर्वांनाच वाटत होती. विविध पक्षांचे नेते, उमेदवार, कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना दिसत होते.
मतदानासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ठाणेदार उमेश पाटील सतत मतदान केंद्रांची पाहणी करीत होते. मतदानादरम्यान कोणत्याच केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी ५.३0 पर्यंत तब्बल ७३.८२ टक्के मतदान झाले. यात २ हजार ३६0 पुरूष तर, २ हजार १२६ महिला, अशा एकूण ४ हजार ४८६ मतदारांनी मतदानाचा हक्क हक्क बजावला. या निवडणुकीसाठी दोन झोनल अधिकारी, २१ मतदान केंद्राध्यक्ष (चार राखीव) नियुक्त केले होते. याशिवाय ६३ मतदान अधिकारी (१२ राखीव) नेमण्यात आले होते. ईव्हीएम मशीन व कर्मचारी नेण्यासाठी पाच चार चाकी वाहने, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २१ पोलीस (चार राखीव) ठेवण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वणीचे उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दादाजी डोल्हारकर व तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर आहे. (तालुका प्रतिनिधी)

झरीत मतदानासाठी उत्साह
झरी : येथील मतदान केंद्रावर रविवारी सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून येत होती. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
दुपारी ४.३० वाजेपर्यंत ८२.३५ टक्के मतदान झाले होते. त्यात ३९५ महिला व ३९९ पुरूष, अशा एकूण ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी ११ वाजतापर्यंत मतदानासाठी थोडीफार गर्दी दिसून येत होती. दुपारनंतर मतदानाचा वेग थोडा कमी झाला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी काही केंद्रांवर मतदारांनी हजेरी लावली होती. येथे नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते. झरी ही देशातील सर्वात लहान नगरपंचायत असून आदिवासीबहूल आहे. मतदारांमध्ये आदिवासी मतदारांची संख्या जादा आहे. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८७.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ४३७ पुरूष तर ४०४ महिलांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक सहामध्ये १०० टक्के मतदान झाले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Polling in the municipal polls is peaceful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.