पुत्रप्रेमातून काँग्रेस नेत्यांचे सूडाचे राजकारण
By Admin | Updated: August 5, 2014 23:35 IST2014-08-05T23:35:41+5:302014-08-05T23:35:41+5:30
कालपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सामूहिक निर्णय घेणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पूत्रप्रेमात आंधळे झाले आहे. त्यातूनच त्यांनीच नव्हे तर

पुत्रप्रेमातून काँग्रेस नेत्यांचे सूडाचे राजकारण
यवतमाळ : कालपर्यंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सामूहिक निर्णय घेणारे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पूत्रप्रेमात आंधळे झाले आहे. त्यातूनच त्यांनीच नव्हे तर काँग्रेसच्या काही नेत्यांनी पूत्रप्रेमातून सुडाचे राजकारण करण्याचा सपाटा चालविला आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येथे पत्रपरिषदेत केला.
देवानंद पवार म्हणाले, पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गावर दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार लाभार्थी आजही घरकुलापासून वंचित आहे. यासह विविध मागण्यांसाठी घाटंजी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
राज्य शासनाला अथवा कुठल्या पुढाऱ्याला यात टार्गेट करण्याचा विषय नव्हता. असे असताना सामाजिक न्यायमंत्री मोघे यांनी आपल्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला. एवढेच नव्हेतर तांडा वस्ती सुधार योजना, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा परिषद गटनेते पद असे सर्वकाही हिरावण्यात आले. घाटंजी येथील मोर्चाचे नेतृत्व एकट्याने केले नव्हते. त्यामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. असे असताना एकट्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आपण गटनेते पदापासून सर्वकाही गमावले. त्यामुळे आता गमावण्यासारखे आपल्याकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही असे सांगत आता मोघे यांच्यावर गमावण्याची वेळ आली असल्याचा इशाराही पवार यांनी दिला. पत्रपरिषदेला पंचायत समिती सदस्य शैलेश इंगोले, घाटंंजी तालूका कॉग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक सैय्यद रफीक, संचालक रमेश आंबेपवार, संजय निकडे उपस्थित होते. त्यांनीही सामाजिक न्यायमंत्री मोघे यांच्यावर विविध आरोप केले.
(स्थानिक प्रतिनिधी)