रक्ताच्या नात्यातच राजकीय लढाई

By Admin | Updated: October 25, 2015 02:21 IST2015-10-25T02:21:52+5:302015-10-25T02:21:52+5:30

नगर पंचायतीच्या निवडणुकीत रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती आमनेसामने आहे.

Political warfare involves blood | रक्ताच्या नात्यातच राजकीय लढाई

रक्ताच्या नात्यातच राजकीय लढाई

कळंब नगरपंचायत : मामा-भाचा, काका-काकू, आमनेसामने
गजानन अक्कलवार कळंब
नगर पंचायतीच्या निवडणुकीत रक्ताच्या नात्यातीलच व्यक्ती आमनेसामने आहे. मामा-भाचा, काका-काकू, पुतणी, सून यांच्यातील नगरसेवक होण्यासाठीची ही लढाई शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
या नगर पंचायतीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ९४ उमेदवार आपले भाग्य अजमावीत आहे. प्रभाग क्रमांक ८ आणि १३ मधील निवडणूक नात्या-गोत्यातील निवडणूक ठरली आहे. यात कोणते नाते कोणावर भारी पडते, हे पाहणे मोठे रंजकदार ठरणार आहे.
प्रभाग सात मध्ये भाचानेच मामाला आव्हान दिले आहे. एवढेच नाही तर, या प्रभागातून पुतण्यानेही काकाविरुध्द दंड थोपटले आहे. एकाच नात्यातील लोकांची एकमेकाविरुध्द होणारी ही राजकीय लढाई मनोरंजनाचा विषय ठरली आहे. मामा असलेले दिवाकर सुटकर हे राष्ट्रवादीकडून रिंगणात आहे, तर भाचा वासुदेव दाभेकर याने भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर मामाला आव्हान दिले आहे. एवढेच नाही, तर दिवाकर सुटकर यांच्या नात्याने पुतण्या लागत असलेले नामदेव लोणकर हे काँग्रेसकडून चक्क काकाला धोबीपछाड देण्यासाठी मैदानात उतरले आहे. मामा-भाचा व काकाच्या या लढाईत कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या लढाईत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच या प्रभागातून सेनेकडून विलास रेंगापूर, बीएसपीकडून ज्योती मरापे आणि विष्णू कोवे हे अपक्ष उमेदवार मैदानात आहे. यात कोणाची सरशी होणार हे निकालानंतरच कळणार आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये खरी लढत एकाच नात्यातील तीन नाईक कुटुंबात आहे. काकु असलेली सुनीता रमेश नाईक हिच्यापुढे पुतणीने म्हणजेच उषा नाईक (कुमरे) हिने तगडे आव्हान उभे केले आहे.
एवढेच नाही तर सुन असलेली
स्मिता सुनील नाईक हीसुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरली
आहे.
महिलांसाठी राखीव असलेल्या या प्रभागात खरी लढाई तीन नाईक घराण्यात पाहायला मिळत आहे. तिनही महिला एकाच परिवारातील असून विविध पक्षाकडून आपले भाग्य अजमावीत आहे. सासु-सुनेच्या लढाईचे किस्से आपण नेहमीच एकतो. परंतु आता राजकारणातील या लढाईत कोण वरचढ होणार, याकडे कळंबवासीयांचे लक्ष लागले आहे.
राजकारण कोणाला किती वर नेऊन पोहोचवेल आणि किती खाली जाण्यास भाग पाडेल, हे सांगता येत नाही. याची परिणीतीही कळंब नगर पंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Political warfare involves blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.