उमरखेडच्या अवैध व्यवसायांना राजकीय पाठबळ

By Admin | Updated: June 25, 2016 02:35 IST2016-06-25T02:35:26+5:302016-06-25T02:35:26+5:30

उमरखेड विधानसभा मतदार संघातील पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचा भंडाफोड ....

Political support to Ummkhed's illegal occupation | उमरखेडच्या अवैध व्यवसायांना राजकीय पाठबळ

उमरखेडच्या अवैध व्यवसायांना राजकीय पाठबळ

गावागावांत अड्डे : मटकाकिंगने केला पत्रकार परिषदेत भंडाफोड
उमरखेड : उमरखेड विधानसभा मतदार संघातील पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचा भंडाफोड खुद्द एका मटकाकिंगने उमरखेड येथे पत्रकार परिषदेत केला. एवढेच नाही, तर ठाणेदारासोबत झालेल्या मोबाईल संवादाची ध्वनिफीतही पत्रपरिषदेत ऐकून दाखविली. यामुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उमरखेड मतदारसंघात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय भाजपा आमदार राजेंद्र नजरधने आणि संबंधित ठाणेदारांच्या संगनमताने सुरू असल्याचे व्यावसायिक दारासिंग रुढे यांनी केला. उमरखेड विधानसभा मतदारसंघात दोन तालुके येत असून त्यात उमरखेड आणि महागावचा समावेश आहे.
महागाव पोलीस ठाण्यांतर्गत खुलेआम अवैध धंदे सुरू असून उमरखेड, बिटरगाव, दराटी व पोफाळी या चार ठाण्यांतर्गत गाव तेथे जुगार व मटका अड्डे उघड्या डोळ्यांनी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात अवैध व्यवसायाचे प्रस्थ वाढले असल्याचे रुढे यांनी यावेळी सांगितले.
पोफाळी पोलिसांसोबत संधान साधून दारासिंग रुढे यांनी अवैध मटका सुरू केला होता. गेल्या दोन वर्षांपासून मटका सुरू होता. परंतु आता ठाणेदाराने दूरध्वनीवरून मटका बंद करण्याचे सांगितले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे १२ जून रोजी १५ कोटींच्या भूमिपूजनासाठी उमरखेड येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आले होते. त्यावेळी रुढे यांनी उमरखेड शहरात ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार नजरधने संतप्त झाले आणि माझा मटका बंद करण्याचे आदेश ठाणेदाराला दिल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ठाणेदारांसोबत झालेल्या संवादाची ध्वनिफीत उपस्थितांना ऐकून दाखविली. यामुळे अवैध व्यवसायाचा भंडाफोड झाला असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)

तुझा मटका बंद कर
पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांनी दारासिंग रुढे यांना मोबाईलवरून ‘तुझे पैसे मिळाले, मात्र यापुढे तुझा मटका बंद कर आणि राजकारण कर’ असा सल्ला दिला. स्वत: आमदाराने तुझा धंदा बंद करण्यास सांगितले आहे. त्यावर रुढे म्हणाले, मेरे पास भी खासदार है यावर ठाणेदाराने तेरा खासदार क्या करता असे धमकाविले. ही ध्वनीफित सर्वांना ऐकविल्याने एकच खळबळ उडाली.

Web Title: Political support to Ummkhed's illegal occupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.