उमरखेडमध्ये राजकीय वातावरण तापले

By Admin | Updated: January 16, 2017 01:06 IST2017-01-16T01:06:44+5:302017-01-16T01:06:44+5:30

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

The political atmosphere in Umarkhed has been eroded | उमरखेडमध्ये राजकीय वातावरण तापले

उमरखेडमध्ये राजकीय वातावरण तापले

नेत्यांची होत आहे कसरत : सर्वच पक्षात इच्छुकांची वाढली गर्दी
उमरखेड : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सहा जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षही आपले उमेदवार उभे करण्यासाठी बैठका घेत आहेत. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघात सध्या सत्ताधारी भाजपाने येत्या निवडणुकीत आपलीच सत्ता येणार ही भूमिका घेत आमदार राजेंद्र नजरधने व आमदार उत्तमराव इंगळे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढणे सुरू केले आहे. गटप्रमुखांच्या बैठका त्यांनी घेणे सुरू केले आहे. याच दरम्यान उमरखेड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी सेनेला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राजकीय मैदानात चांगलीच खळबळ माजली आहे. सध्या तरी भाजपाकडे कार्यकर्त्यांची गदी दिसून येत आहे. माजी आमदार अ‍ॅड़ अनंत देवसरकर व विजय खडसे यांच्यासह इतर काँग्रेस नेते तालुक्यातील सहा पैकी सहा व १२ पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी ग्रामीण भागात संपर्क दौरे करीत आहेत. सध्या पाच जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे असून, पंचायत समिती सभापती व उपसभापती काँग्रेसचा आहे. त्यांनी देखील आपली बाजू भक्कम करण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते व निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी दिली जाण्याचे संकेत काँग्रेसकडून दिले गेले आहे. त्यामुळे बऱ्यापैकी तिकीटांसाठी इच्छुकांची गर्दी काँग्रेसच्याही तंबुत दिसून येत आहे. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक उमरखेड येथे घेतली.
त्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत कार्यकर्त्यांना दिले. त्यामुळे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर हे शिवसेनेमध्ये आहेत परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांचे कट्टर समर्थक सहकारमधील नेते भाजपामध्ये गेले. ही गळती रोखण्याचे आव्हान मोठ्या प्रमाणात आहे. यावरच सेनेची पुढील ताकद स्पष्ट होईल. (शहर प्रतिनिधी)

नेत्यांचा बैठकांवर जोर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील सर्वच नेते कामाला लागले आहे. पक्षांच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यावर पक्ष नेत्यांचा जोर आहे. त्यामुळे तालुक्यात बैठकांवर जोर दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रात्रीही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरीच सभा घेणे सुरू आहे. इच्छुकांच्या मुलाखती, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांच्या भेटी-गोठी सुरू आहेत. निवडणुका पाहता अनेकजण पक्ष बदल करण्याच्या विचारात आहेत. हे स्थलांतरण थांबविण्याचे आव्हान सर्वच पक्षातील नेत्यांना पेलवावे लागत आहे.

Web Title: The political atmosphere in Umarkhed has been eroded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.