पोलिसांचेही अवैध धंदे !
By Admin | Updated: June 3, 2015 00:09 IST2015-06-03T00:09:34+5:302015-06-03T00:09:34+5:30
जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक या सारख्या अवैध धंद्यांमध्ये चक्क काही पोलिसांचीही ....

पोलिसांचेही अवैध धंदे !
कारवाई करणार कोण ? : नातेवाईकांच्या नावाने प्रवासी वाहने
यवतमाळ : जिल्ह्यात दारू, जुगार, मटका, अवैध प्रवासी वाहतूक या सारख्या अवैध धंद्यांमध्ये चक्क काही पोलिसांचीही भागीदारी आहे. ही बाब कुणालाही सहजासहजी खरी वाटणार नाही, परंतु हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र या धाडी टाकताना काही पोलीस कर्मचाऱ्यांचे या धंदेवाईकांशी एवढे सलोख्याचे संबंध निर्माण झाले की आता त्यांनीच भागीदारीत हे व्यवसाय सुरू केले आहे. अर्थात ही भागीदारी कुठेही रेकॉर्डवर नसल्याने कुणालाही सिद्ध करणे शक्य नाही. मात्र ही भागीदारी पोलीस खात्यात कुणापासूनच लपलेली नाही. खाकी वर्दीची भागीदारी असलेल्या या धंद्यांकडे धाड पथक सहसा जात नाही.
यवतमाळ शहरातील अनेक धंद्यांमध्ये खाकी वर्दीची अघोषित पार्टनर शिप आहे. कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले कौटुंबिक सदस्य, नातेवाईक व विश्वासू व्यक्तींच्या नावावर प्रवासी वाहतूक करणारी वाहने घेतली आहेत. या वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक सर्रास केली जाते. अन्य वाहनांना त्यापोटी हप्ता द्यावा लागतो. मात्र पोलिसांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाहनांकडून हप्ता घेतला जात नाही. अशा वाहनांचे सर्वाधिक प्रकार हे पुसद उपविभागात आहेत. यवतमाळातही ही संख्या कमी नाही. विशेषत: वाहतूक शाखेत नोकरी केलेल्यांनी मोठ्या प्रमाणात अशी वाहने घेतली गेली आहे. अवैध धंद्यांमध्ये भागीदारी असलेले हे पोलीस कर्मचारी खात्यात गुन्हे शाखा, डीबी पथक, वाहन चालक, ट्रॉफिक अशा की-पोस्टवर आहेत. त्यामुळे प्रत्येकच हालचालींची त्यांना खबर असते. योग्यवेळी ते धंदे-वाहतूक बंद ठेवण्याची खबरदारीही घेतात.
ढाबे, बार, बीअर शॉपी, वणी विभागात कोळसा वाहतूक या प्रकारात ही भागीदारी आहे. स्वत:च अवैध व्यवसायात असल्याने हे पोलीस कर्मचारी आपल्या अन्य स्पर्धक व्यावसायिकांना खाकी वर्दीच्या आडून त्रास देताना दिसतात.
या व्यवसायिकांविरुद्ध खोट्या तक्रारी करणे, आपल्या सहकारी पोलिसांना सांगून धाडी घालणे, हेतुपुरस्सर कठोर कारवाई करणे, दमदाटी करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविणे असे प्रकार सर्रास पहायला मिळतात. शहरातील एका बीअर शॉपीचा वाद काही दिवसांपूर्वी येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचला तेव्हा या वादामागे आपल्याच एका पोलीस कर्मचाऱ्याची व्यावसायिक स्पर्धा असल्याचे व त्यातूनच खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचे आढळून आले होते. हा कर्मचारी आजही महत्वाच्या शाखेत कार्यरत आहे.
राजकीय संबंधाच्या बळावरच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात आजही जुगार अड्डे, क्रिकेट सट्टा, कोळशाची चोरी व वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक हे प्रकार सुरु आहे. यामुळेच कुठेही ठोस कारवाई होताना दिसत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)
दारू, जुगार, अवैध वाहतूक, बार-ढाबे, कोळसा, बीअर शॉपीत भागीदारी
काही दिवसांपूर्वी शहरात उघडकीस आलेल्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणातही अशीच भागीदारी पुढे आली. या घटनांमागे एका पोलीस कर्मचाऱ्याचे नेटवर्क असल्याची चर्चा यावेळी होती. हा कर्मचारी आजही कायम आहे. एवढेच नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याशी भागीदारीत जुगार अड्डा चालविणाऱ्या व्यावसायिकानेच या मंगळसूत्र चोरीतील बहुतांश सोने खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. या अवैध धंद्यांमध्ये केवळ काही पोलीसच आहे, असे नव्हे तर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही गुंतले असल्याची माहिती आहे.