ड्युटीवरील पोलिसाला ऑटोरिक्षा चालकाकडून मारहाण; आरोपीला अटक
By विलास गावंडे | Updated: January 29, 2024 19:18 IST2024-01-29T19:18:15+5:302024-01-29T19:18:54+5:30
पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

ड्युटीवरील पोलिसाला ऑटोरिक्षा चालकाकडून मारहाण; आरोपीला अटक
दारव्हा (यवतमाळ) : शहरातील बसस्थानक चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाने मारहाण केली. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. इजमाम खान इस्माईल खान रा.दारव्हा, असे आरोपीचे नाव आहे.
येथील बसस्थानक चौकात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी कैलास देवकर यांनी बसस्थानक परिसरात शंभर मीटरच्या आत अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याने ऑटोरिक्षा (क्र. एमएच २६-७३७२) चालकाला हटकले. यावरून ऑटो चालकाने पोलिस कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ केली. तसेच बस स्थानकातून दोन महिलांना सोबत आणून कॉलर पकडून मारहाण केली. यासंदर्भात पोलिस कर्मचारी कैलास देवकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.