शेतकऱ्यांचा मुलगा व मुलगी झाले पोलीस उपनिरीक्षक
By Admin | Updated: March 18, 2015 02:24 IST2015-03-18T02:24:47+5:302015-03-18T02:24:47+5:30
वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते.

शेतकऱ्यांचा मुलगा व मुलगी झाले पोलीस उपनिरीक्षक
आर्णी : वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते. आणि त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. अशोक जेता राठोड रा.आंबोडा या शेतकऱ्याचे मुलगा व मुलगी हे दोघेही पोलीस उपनिरीक्षक झाले.
अशोक राठोड यांच्या मुलांनी आपल्या शेतकरी पित्याचे स्वप्न पूर्ण केले. दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत घेवून हे यश संपादन केले. वडील शेतकरी असल्याने त्यांचे शिक्षण आर्णी येथे काकाकडे झाले. काका म.द. भारती शाळेत आहेत. तर बहीण नम्रता ही उमरखेडला पोलीस असलेल्या काकांकडे शिक्षणासाठी होती. भाऊ विकास याने प्राथमिक शिक्षण आर्णीला तर पुढील शिक्षण पुसद व चंद्रपूरला पूर्ण केले. एम.एस्सी. बी.एड. केल्यानंतर विकासने प्राध्यापक म्हणून चंद्रपूरला एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर ही नोकरी कायम ठेवण्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार होते.
आपण हे करू शकणार नाही, याची त्याला जाणिव झाल्याने त्याने पीएसआयसाठी तयारी सुरू केली, तर दुसरीकडे बहीण नम्रता हिने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकांप्रमाणे आपणही पोलीस खात्यात जावे यासाठी पीएसआय होण्याचे ठरविले.
दोन्ही भावंडांनी सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. २०१३ मध्ये दोघेही परीक्षेला बसले. आणि उत्तीर्ण होवून त्यांची निवडही झाली. यामध्ये विकास महाराष्ट्रातून व्हीजे प्रवर्गातून १३ व्या स्थानी तर नम्रता ही सातव्या स्थानी होती. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय काका, काकू, आई, वडील व शिक्षक यांना दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही कठोर परिश्रमाने इतरांप्रमाणेच यश संपादन करू शकतात, हे या दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
(शहर प्रतिनिधी)