पोलिसांमुळे तीन मुलांच्या चेहऱ्यावर उमटली ‘मुस्कान‘
By Admin | Updated: July 11, 2015 00:08 IST2015-07-11T00:08:17+5:302015-07-11T00:08:17+5:30
पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान‘ राबवून बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेणे सुरू केले.

पोलिसांमुळे तीन मुलांच्या चेहऱ्यावर उमटली ‘मुस्कान‘
वणी : पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान‘ राबवून बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेणे सुरू केले. येथील पोलिसांनी या आॅपरेशन अंतर्गत तीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.
गेल्या १ जुलैला येथील पोलिसांनी जपन्ना रमेश पवार (७) व शारदा रमेश पवार (५) या दोन बालकांना शोधून काढले. हे दोघे बहिण-भाऊ त्या दिवशी मुंबई-नागपूर नंदिग्राम एक्सप्रेसने जात होते. वणीत एक्सप्रेस पोहोचताच ते येथील रेल्वे स्टेशनवर उरले. नंतर ते दिशाहीन झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या भावंडांना गाठले. त्यावेळी ते थंडीने कुडकुडत होते. ते अनेक दिवसांपासून उपाशीही दिसत होते.
या बालकांना लगेच पोलिसांनी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेवळी ते अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्यांना पोलिसांनी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथेच जपन्ना याने दिलेल्या माहितीवरून त्यांच्या पालकांचा शोध घेण्यात आला. यात चंद्रपूर येथील बंगाली कॅम्पमधील गंगुबाई उमाकांत ढाकाजी ही महिला त्यांची मोठी बहिण असल्याचे अढळून आले. या दोनही बालकांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेनंतर ८ जुलैला शहरातील रवीनगर परिसरात एक साडे तीन वर्षीय बेवारस बालक आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांचा शोध घेतला. यात हा बालक तालुक्यातीलच सुकनेगाव येथील विनोद गौरकार यांचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. ठाणेदार अस्लम खान यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक चांदेकर, सुधीर पांडे, वासू नरनावरे, नीलेश बोरकर आदींनी या शोध महिमेत सहभाग घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)