पाणी वितरणासाठी हवे पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 21:52 IST2018-04-12T21:52:20+5:302018-04-12T21:52:20+5:30
शहरात भीषण पाणीटंचाईने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र पाणी मिळण्यासाठी नागरिक आक्रमक होऊन नगरसेवकांना धारेवर धरतात. तर टँकर चालकाच्या अंगावरही धावून जातात. यामुळे पाणी वितरण करताना अनर्थ होण्याची शक्यता आहे.

पाणी वितरणासाठी हवे पोलीस संरक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाईने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र पाणी मिळण्यासाठी नागरिक आक्रमक होऊन नगरसेवकांना धारेवर धरतात. तर टँकर चालकाच्या अंगावरही धावून जातात. यामुळे पाणी वितरण करताना अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाणी वितरण करताना टँकरसोबत चार्ली कमांडो द्यावे, अशी मागणी यवतमाळातील नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुरुवारी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. टँकरशिवाय नागरिकांना पर्याय नाही. मात्र काही भागात टँकरमधील पाणी वितरण करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिक करतात. त्यामुळे टँकर आला की त्या भागातील नागरिक आक्रमक होतात. तसेच पाणी मिळविण्यासाठी अनेकदा झटापटीही होतात. अनेकांना पाणीच मिळत नाही. काही भागात टँकर येत नाही. त्यामुळे या भागात प्रतीक्षेनंतर टँकर पोहोचल्यावर नागरिक आक्रमक झालेले दिसतात.
टँकर चालकासोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही नित्याचे झाले आहे. तर अनेकदा टँकरसोबत आलेल्या नगरसेवकांनाही नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो.
यातून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पाणी वितरणात गोंधळ होऊ नये म्हणून टँकरसोबत चार्ली कमांडो द्यावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी गुरुवारी प्रत्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, बबलू देशमुख, वैशाली सवई यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.