पोलीस प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 9, 2017 22:44 IST2017-03-09T22:44:48+5:302017-03-09T22:44:48+5:30
पोलीस दलात कार्यरत प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील डेहणकर ले-आऊटमध्ये

पोलीस प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 9 - पोलीस दलात कार्यरत प्रेमी युगुलाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना येथील डेहणकर ले-आऊटमध्ये गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दोघांचीही यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. प्रियकर हा यवतमाळ येथे तर प्रेयसी मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे.
अन्सार कादीर बेग (३५) रा. डेहणकर ले-आऊट यवतमाळ असे पोलीस शिपायाचे नाव आहे. तो दोन दिवसापूर्वीच अकोला दहशतवाद विरोधी पथकातून (एटीएस) यवतमाळ येथे रुजू झाला होता. नागपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात वर्षभरापूर्वी कार्यरत असताना मुंबई येथील प्रिया (३५) नामक महिला पोलीस शिपायासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. अन्सार विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. तर प्रिया हीसुद्धा विवाहित असून तिलाही एक मुलगा आहे. मात्र प्रेमात आकंठ बुडालेली प्रिया आठ दिवसापूर्वी यवतमाळात आली. या दरम्यान प्रियाचे नातेवाईकही यवतमाळात आले. त्यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दरम्यान गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अन्सार यांच्या डेहणकर ले-आऊट स्थित निवासस्थानी या दोघांनी विष प्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणाने केला हे कळू शकले नाही. वडगाव रोड पोलिसांना दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे बयान नोंदविता आले नाही. या घटनेने पोलीस वर्तुुळात खळबळ उडाली आहे.