पोलीस तपासांची केवळ खानापूर्ती
By Admin | Updated: December 9, 2015 02:45 IST2015-12-09T02:45:07+5:302015-12-09T02:45:07+5:30
जिल्हा पोलीस दलात बॅकिंग नसल्याची दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांची ओरड आहे. त्यामुळे नोकरी टिकवायची असल्याने पोलीस तपासाची केवळ खानापूर्ती केली जात आहे.

पोलीस तपासांची केवळ खानापूर्ती
बॅकिंग नसल्याचा सूर :गुन्हेगारी वर्तुळातील ‘खाकी’ची जरब संपली
सुरेंद्र राऊत यवतमाळ
जिल्हा पोलीस दलात बॅकिंग नसल्याची दुसऱ्या फळीतील अधिकाऱ्यांची ओरड आहे. त्यामुळे नोकरी टिकवायची असल्याने पोलीस तपासाची केवळ खानापूर्ती केली जात आहे. पर्यायाने गुन्हेगारांवरील वचकही संपला आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह डिटेक्शनची क्षमता असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या वरिष्ठांकडून बॅकिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलीस खात्यात आता पुढे येऊन काम करणे सोपे राहिलेले नाही. जिल्ह्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी अडचणीच्या काळात आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे काम करताना प्रत्येकच जण सावध पवित्रा घेतात. कित्येक घटना होण्यापूर्वीच त्याची चाहूल लागलेली असते. मात्र यातील संशयितावर कारवाई करताना प्रकरण अंगलट येण्याची भीती असते. अशा स्थितीत संबंधित ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे अंगुली निर्देश केला जातो. एसडीपीओ थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आणि तेथून पोलीस महानिरिक्षकाच्या दरबाराचा रस्ता दाखविण्यात येतो. अनेदा गुन्हेगारांना आवरण्यासाठी कायद्याच्या चाकोरीचा भंग होतो. अशा वेळी वरिष्ठांची पाठराखण महत्त्वाची असते. तातडीने तपासकामी ठाण्याबाहेर पडताना वेळेवर वाहनच उपलब्ध होत नाही. शासनाकडून तपासाकरिता कोणतेच विशेष आर्थिक सहाय्य केले जात नाही. याची तरतूद अधिकारी स्तरावरच केली जाते. त्यासाठी अवैध व्यावसायिकांची मदत घ्यावी लागते. अन्यथा गुन्हेगार पसार होण्यात यशस्वी होतात. शहरात अथवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्राईम कंट्रोल करण्यासाठी ज्या प्राथमिक बाबी करणे आवश्यक आहे. याकडेच वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. केवळ कागदोपत्री आकडेमोड करून घेतली जात आहे. गुन्हेगारी क्षेत्रात शिरकाव करणारे आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणारे समाजात आहेत. अशाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक शिपायाने साधी दुचाकी पकडली तरी स्थानिक आमदार अथवा राजकीय पुढाऱ्याचा फोन येतो, अशा स्थितीत वरिष्ठ सोबत नसले तर का म्हणून रिस्क घ्यायची, असा प्रश्न दुय्यम अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नोकरीत आपली छाप सोडण्याची प्रत्येकाचीच मनोमन इच्छा आहे. हेच उमेदीचे दिवस असल्याने कीर्तीमान निर्माण करावा वाटतो, परंतु एकट्याने व्यवस्थेशी किती संघर्ष करायचा, शेवटी आहे त्या प्रवाहात सामावूनच नोकरी करावी लागते. प्रत्येक वेळी कुटुंबाकडे दुर्लक्ष करता येत नाही. रात्रंदिवस मेहनत करून पोलीस खात्यातील अधिकाऱ्याची संधी मिळाली त्यातही मनासारखे काम करण्यास प्रोत्साहन मिळत नाही. मन मारून केवळ खानापूर्ती करावी लागत असल्याचा सूर पोलीस दलातील दुय्यम अधिकाऱ्यांतून ऐकायला मिळतो.
‘सायबरसेल’च्या एका संगणकावर ३१ ठाणे
जिल्हा मुख्यालयात असलेल्या सायबरसेलची अतिशय दूरवस्था आहे. अनेकादा गुन्हेगाराचे मोबाईल लोकेशन मिळविण्यासाठी अथवा सायबर क्राईम संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी येथे संपर्क केला जातो. या सेल मध्ये केवळ दोन संगणक आहे. त्यातील एक पुर्णत: निकामी आहे. एकाच संगणकावर जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांचा कारभार सांभाळावा लागतो. त्यामुळे वेळेत तपास कामी मदत करता येत नाही. या सेलसाठी स्वतंत्र व सुसज्ज कक्ष नसल्याने अनेक अडचणी येतात. गुन्हेगाराच्या शोधात असलेल्या पथकांना ही माहीत वेळेत मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.