पोलिसांवर जुगाऱ्यांचा हल्ला

By Admin | Updated: November 6, 2015 03:44 IST2015-11-06T03:44:10+5:302015-11-06T03:44:10+5:30

स्थानिक इदगाहनजीकच्या माता मंदिर शेडमधील जुगार अड्ड्यावर धाड घालणाऱ्या पोलीस पथकावर जुगाऱ्यांनी

Police gamblers attack | पोलिसांवर जुगाऱ्यांचा हल्ला

पोलिसांवर जुगाऱ्यांचा हल्ला

पांढरकवडा : स्थानिक इदगाहनजीकच्या माता मंदिर शेडमधील जुगार अड्ड्यावर धाड घालणाऱ्या पोलीस पथकावर जुगाऱ्यांनी हल्ला केला. यात पोलीस उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली.
गुड्डू रॉय याच्या जुगाराची टीप मिळताच पांढरकवड्याचे उपनिरीक्षक संदीप मांजरने यांचे पथक धाड घालण्याजासाठी पोहोचले. तेथे मर्क्युरी लाईट, गाद्या-लोड, चारही बाजूने पडदे लावून १५ ते २० जणांचा पत्त्यांचा जुगार सुरू होता. तेथे जप्तीची कारवाई सुरू होताच गुड्डू रॉय व त्याचा साथीदार पळून गेला. परंतु त्याचा मोबाईल घटनास्थळी जप्त केला. दरम्यान जुगाऱ्यांनी अचानक लाथा-बुक्क्यांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. घटनास्थळाच्या जवळच जेवणावळ सुरू होती. तेथील मंडळींनी पोलिसावरच जेवणाच्या प्लेटांची फेकाफेक करून अन्नाची नासधूस केल्याचा आरोप लावला. जुगाऱ्यांनी मोबाईलवरून आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला. प्रभारी ठाणेदार राखी गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव घटनास्थळी पोहोचले. तापर्यंत हल्लेखोर जुगारी घटनास्थळावरून पसार झाले.गुरूवारी पहाटे ४ वाजतापर्यंत तणाव कायम होता. या हल्यात संदीप मांजरने यांच्यासह बलराम शुक्ला, सूरज साबळे, प्रशांत झोड, विजय केराम, पंकज दोनाडकर, गौतम मनोहर आदी पोलीस कर्मचारी जखमी झाले. सुरेश साबळे यांच्या छातीला जबर मार लागल्यामुळे त्यांना यवतमाळला ‘रेफर’ करण्यात आले. मांजरने यांच्या डोळ्याला मार लागला. या घटनेत जुगाऱ्यांनी उपनिरीक्षक मांजरने यांचा मोबाईल व रोख पाच हजार २०० रूपये हिसकावून नेल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी गुड्डू उर्फ अभिनव दिलीप रॉयसह १४ जणांविरूद्ध भादंवि ३९५, ३५३, ३३२ व सहकलम १३ मुंबई जुगार अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल केला आहे. आरोपींमध्ये संदीप चवरे, दिलीप हस्ते, कुलदीप चवरे, विक्रम व्यास, विष्णू लेंदरे, सागर व्यास, रोशन बिसमोरे, रोहित रिदर, रणजीत व्यास, मोहित व्यास, पपई रामचवरे, दिनेश कुंडापे, नितिन व्यास आदींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्त लिहीपर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. प्रकरणात आणखी १० ते १२ आरोपी असल्याचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. जप्त मोबाईल जुगार अड्डा चालकाचा असावा, असा पोलिसांना संशय आहे. यानिमीत्ताने मोबाईलमधील जुगाऱ्यांची ‘कुंडली’ही पोलिसांच्या हाती लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)

यापूर्वीही पोलिसांवर केला होता हल्ला
४यापूर्वी पिंपळखुटी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकायला गेलेल्या पोलिसांवर जुगाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यावेळीही दिलीप रॉय याचा जुगार अड्डा सुरू होता, हे विशेष. पोलिसांवर हल्ला करण्याची हिंमत जुगारी करतातच कशी, असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात असून त्यासाठी ‘हप्तेखोरी’ हे कारण जबाबदार मानले जात आहे.

Web Title: Police gamblers attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.