लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा येथे रस्त्यावर गाेंधळ घालणाऱ्या तिघांना पाेलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. यातील एकाचा पाेलीस ठाण्यात मृत्यू झाला. त्यानंतर रात्री जमावाने दारव्हा पाेलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करीत पाेलिसांच्या वाहनाची ताेडफाेड केली. यानंतर दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल दाखल झाले. पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या युवकाचे शव बुधवारी सकाळी वैद्यकीय चिकत्सेकरिता यवतमाळात आणण्यात आले. खबरदारी म्हणून शवविच्छेदनगृह व यवतमाळ शहरातील प्रमुख कार्यालयांभाेवताली कडेकाेट पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. दारव्हा येथे पाेलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर पाेलीस ठाण्यांतून कुमक दारव्हा येथे पाठविण्यात आली. जिल्हा पाेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे मंगळवारी रात्रीपासून दारव्हा पाेलीस ठाण्यात तळ ठाेकून आहेत. मृतक शेख इमरान शेख शब्बीर (३०), रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा यांचा मृतदेह यवतमाळात वैद्यकीय चिकत्सेकरिता आणण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात इन कॅमेरा चिकित्सा करण्यात आली. यावेळी मृताचा भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर यांच्यासह काही नातेवाईक उपस्थित हाेते. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पाेलीस अधीक्षक कार्यालय येथे पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. पाेलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दारव्हाचे पडसाद यवतमाळात उमटू नयेत यासाठी पाेलिसांनी सर्वच प्रमुख कार्यालयांसमाेर बंदाेबस्त लावला हाेता.
मारहाणीनेच मृत्यू झाल्याचा आराेप - शेख इमरान यांंना दारव्हा पाेलीस ठाण्यात मंगळवारी रात्री हतकडी लावून बेदम मारहाण झाली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असा आराेप शेख जाबीर यांनी केला आहे. दाेषी चार पाेलीस कर्मचाऱ्यांविराेधात कायदेशीर कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे केली. साेबतच या प्रकरणाची सीआयडी चाैकशी केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
बाहेर जिल्ह्यातून ९०० पाेलीस दाखल - दारव्हा येथे पाेलीस ठाण्यावर दगडफेक झाली. यात तीन पाेलीस कर्मचारी जखमी झाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्याबाहेरून सहा पाेलीस निरीक्षक, सहा सहायक पाेलीस निरीक्षक व ९०० पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर शेख इमरान यांचा दफनविधी हाेईपर्यंत दारव्हा व यवतमाळ येथे बंदाेबस्त लावण्यात आला आहे.
दारव्हा येथे जमावबंदी - दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांनी जमावबंदी आदेश जारी केला आहे. - शहरातील प्रमुख चौकात दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त कायम होता. तणावपूर्ण शांततेत शहरातील बाजारपेठ सुरु होती. - शेख इरफान याची शवचिकित्सा झाल्यानंतर त्याच्या पार्थिवावर दारव्हा येथे रितीरिवाजाप्रमाणे दफन विधी करण्यात आला. यावेळी कुटुंबीयासह मोठ्यासंख्येने उपस्थित होते. दफनविधी शांततेत पार पडला.