आरोपीला दिली पोलीस पाटीलपदी नियुक्ती
By Admin | Updated: February 8, 2016 02:41 IST2016-02-08T02:41:06+5:302016-02-08T02:41:06+5:30
तालुक्यातील चिचघाट येथे मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीलाच पोलीस पाटील म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

आरोपीला दिली पोलीस पाटीलपदी नियुक्ती
यवतमाळ : तालुक्यातील चिचघाट येथे मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीलाच पोलीस पाटील म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस पाटील पदाच्या निकषामध्ये ठळकपणे चारित्र्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यातही कुठल्याही स्वरुपाचा गुन्हा नसलेल्या निष्कलंक व्यक्तीची निवड करण्याचे निर्देश आहे. मात्र त्या उपरही यवतमाळ उपविभागीय दंडाधिकाऱ्याने आरोपीला नियुक्तीपत्र दिले आहे.
पोलीस पाटील पद भरतीत चिचघाट येथून वीरेंद्र राठोड याने ६९ गुण मिळविले तर विशाल पवार याने ५९ गुण घेतले. मात्र गुणानुक्रमाने पात्र ठरलेल्या वीरेंद्र राठोड याच्यावर वडगाव जंगल ठाण्यात भादंविच्या कलम ३२४, ३२६ नुसार गुन्हा दाखल आहे. शिवाय तो दोन दिवस पोलीस कोठडीत होता. त्यानंतरही उपविभागीय अधिकाऱ्याने सदर व्यक्तीची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती केल्याची तक्रार विशाल किसन पवार याने केली आहे. विशाल पवार याला ९ नोव्हेंबर २०१५ रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस पाटील पदासाठी निवड झाली असून, चारित्र्य प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. तसे लेखी पत्रही देण्यात आले. चारित्र्य प्रमाणपत्र व शारीरिक क्षमता प्रमाणपत्र सादर करण्यास गेल्यानंतर त्याची निवड रद्द झाल्याचे सांगण्यात आले. मारहाणीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला नियुक्तीपत्र दिले आहे. याची तक्रार करणार असल्याचे विशाल याने सांगितले. (प्रतिनिधी)